पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मराठीसह हिंदुत्वाचा मुद्दा अगदी जोरकसपणे मांडला. राज ठाकरे यांनी यावेळी मशिदींवरील भोंग्यांना तीव्र विरोध करत सरकारला इशारा दिलाय. इतकंच नाही तर मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच राज यांनी दिले होते. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळं मनसेत नाराजी पाहायला मिळाली. मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आणि नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर आपल्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ऑफर आली मात्र मी मनसेतच राहणार असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलंय. दरम्यान, आज मोरे यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं पाहायला मिळालं.
वसंत मोरेंचं शहराध्यक्ष पद गेल्यानंतर शहर कार्यालयावर जो जल्लोष झाला. तो जल्लोष 9 जुलै 2021 मध्ये झाला होता. ज्या दिवशी मी त्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं. पण, काल मला एख बाब खटकली, वसंत मोरेचं पद गेल्यानंतर फटाके वाजले, आनंदोत्सव साजरा झाला, मिरवणूक निघाल्या, असं का? असा प्रश्न वसंत मोरेंनी विचारला. ‘माझे सगळेच कार्यकर्ते, मित्र आणि पदाधिकारीही म्हणतात वसंत मोरे आल्यापासून पक्षात जान आली, पक्ष वाढला आहे. मग, मी इतकी वर्षे पक्षासाठी जे केलं, त्यावर पाणी फिरलं की काय? असं मला वाटतं’, अशी खंत वसंत मोरेंनी व्यक्त केली.
दरम्यान, वसंत मोरे यांना राज ठाकरे यांनी भेटीसाठी बोलावलं आहे. सोमवारी वसंत मोरे राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर राज ठाकरे यांची भेट घेतील. त्यानंतर वसंत मोरे यांची नाराजी दूर होणार का? पक्षात मोरे यांना नवी जबाबदारी दिली जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोनबाबतची माहिती खुद्द वसंत मोरे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांसोबत माझं डायरेक्टली बोलणं झालं नाही. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरेंचा फोन आला होता. सीएमचा माझ्यासाठी फोन आहे म्हणून सांगत होते. त्यावेळी मी नेमका कात्रजमध्ये नव्हतो. मी सर्वांना सांगितलं मी अजून मनसेत आहे. माझा पदभार मी साईनाथ बाबर यांच्याकडे दिला आहे. पण मी मनसेतच आहे. मुख्यमंत्र्यांनी मला भेटायला या म्हणून मला निरोप दिला आहे. मुख्यमंत्र्याचा आणि इतरांचेही फोन आले, असं मोरे यांनी सांगितलं.
इतर बातम्या :