लखनऊ : भारतीय जनता पार्टीच्या बाईक रॅली दरम्यान गर्दी दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांना पैसे देऊन बोलवण्यात आले असल्याची घटना समोर आली आहे. पैसे वाटत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे भाजपावर सध्या मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील चंदोसी येथील आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण देशात विजय संकल्प रॅलीचे आयोजन 2 मार्च (शनिवारी ) करण्यात आले होते. यावेळी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली. मात्र उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाज कल्याण मंत्री गुलाबो देवींच्या उपस्थितीत रॅलीमध्ये गर्दी वाढवण्यासाठी पैसे वाटण्यात आले होते. 2000 ते 100 रुपयांच्या नोटा यावेळी वाटण्यात आल्या.
चंदोसी विधानसभा क्षेत्रातील बाईक रॅलीची जबाबदारी समाज कल्याण मंत्री गुलाबो देवी यांना देण्यात आली होती. रॅलीमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत होती. मात्र रॅली संपल्यानंतर भाजपच्या काही तथाकथित कार्यकर्त्यांकडून रॅलीमध्ये सहभागी झालेल्या भाजपच्या भाड्याच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटत होते. ही घटना कॅमेरात कैद होताच सर्वत्र व्हायरल झाली आहे.
बाईक रॅलीमध्ये जे लोक भाजपा कार्यकर्ता बनून फिरत होते. ते मात्र सर्व माथाडी कामगार असल्याचे बोललं जात आहे. या सर्वांना पैसे देतो असे सांगून या रॅलीमध्ये सहभागी होण्यास सांगितले होते. चंदोसीच्या शेजारील गावातील लोकांनाही यावेळी बोलवण्यात आले होते. पैसे देऊन आणलेल्या या कार्यकर्त्यांबद्दल गुलाबो देवी आणि भाजपचे स्थानिक नेते प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत आहेत.
व्हिडीओ :