मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जोरदार धक्का देत धनंजय महाडिकांना विजयी केलं. विधान परिषद निवडणुकीतही भाजप त्याचीच पुनरावृत्ती करणार का? देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची रणनिती पुन्हा यशस्वी ठरणार? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, फडणवीसांची जादू विधान परिषद निवडणुकीतही (Vidhan Parishad Election) चालली. भाजपचे पहिले चार उमेदवार विजयी होणार हे निश्चित होतं. पण भाजपचा पाचवाही उमेदवार विजयी झालाय. विधान परिषदेच्या 10 व्या जागेसाठी खरी लढत ही प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात होती. त्यात प्रसाद लाड यांनी बाजी मारली आहे. तर भाई जगताप यांना मोठा धक्का बसलाय.
भाजपने विधान परिषदेसाठी एकूण पाच उमेदवार दिले होते. भाजपच्या संख्याबळानुसार त्यातील चार उमेदवार विजयी होणार हे निश्चित होतं. त्यानुसार विधान परिषदेतील विद्यमान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे विजयी ठरल्या आहेत. पण भाजपचा पाचवा उमेदवारही विजयी झाल्याने राज्याच्या राजकारणात भाजपची बाजू वरचढ बनल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजपचे प्रसाद लाड यांचा पराभव होणार असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात होता. मात्र, भाजपनं पुन्हा एकदा महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिलाय. भाजपचे प्रसाद लाड विधान परिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे भाई जगताप यांचा पराभव केलाय.
भाजपचे एकूण 106 आमदार आहेत. तर अपक्षांसह भाजपचं संख्याबळ 113 इतकं होतं. राज्यसभा निवडणुकीत भाजपला 123 मतं मिळाली होती. म्हणजेच महाविकास आघाडीची 10 मतं फुटली होती. अशावेळी आपल्या उमेदवारांसाठी 30, 30, 28 आणि 29 असा कोटा ठरवला होता. विजयासाठी उमेदवाराला 26 मतांची आवश्यकता होती. त्यामुळे भाजपची 13 मतं प्रसाद लाड यांना ट्रान्सफर होणार हे निश्चित होतं. पण उर्वरित मतं घेत लाड यांनी विजयी मतांचा कोटाही पूर्ण केलाय.
>> प्रवीण दरेकर – 29 मते
>> श्रीकांत भारतीय – 30 मते
>> राम शिंदे – 30 मते
>> उमा खापरे – 27 मते
>> प्रसाद लाड – 28 मते
>> रामराजे नाईक निंबाळकर – 29 मते
>> एकनाथ खडसे – 28 मते
>> भाई जगताप – 26 मते
>> चंद्रकांत हंडोरे – 22 मते (पराभूत)
>> सचिन अहिर – 26 मते
>> आमशा पाडवी – 26 मते