मुंबई : राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही (Vidhan Parishad Election) महाविकास आघाडीला भाजपनं पर्यायानं देवेंद्र फडणवीस यांनी चारी मुंड्या चीत केलंय. विधानसभेच्या 10 जागांपैकी भाजपचे पाच तर महाविकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचा सहावा आणि काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागलाय. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे यावेळी शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसची हक्काची तसंत सहयोगी अपक्ष आमदारांची तब्बल 21 मतं फुटली आहेत. अशावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष होणार की फुटलेल्या मतांवर विचारमंथन होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान, आज निकाल लागल्यानंतर वर्षा बंगल्यावर बैठकांचं सत्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित होते. तसंच या बैठकीत शिवसेनेचे नेते, पक्षाचे मुंबईतील आमदार, पाठिंबा दिलेले काही अपक्ष आमदारांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या फुटलेल्या मतांवर चिंतन झाल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 12 वाजता शिवसेना आमदारांची वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली आहे.
शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी विधान परिषद निवडणुकीत विजयी झाले. मात्र शिवसेनेची स्वत:ची आणि सहयोगी पक्ष आणि अपक्षांची तब्बल 12 मतं फुटली आहे. शिवसेनेचे 55 आमदार आहेत. प्रहार संघटनेचे 2, मंत्री शंकरराव गडाख आणि अपक्ष सहा अशी मिळून शिवसेनेकडे एकूण मतांची संख्या 64 इतकी आहे. मात्र, शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मिळून 52 मतं मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे 3 आमदार फुटले हे उघड आहे. गुप्त मतदान असल्यामुळे फुटलेल्या आमदार सांगणं सध्या तरी कठीण आहे. पण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसाठी हा सर्वात मोठ्या झटका म्हणावा लागेल.
>> प्रवीण दरेकर – 29 मते
>> श्रीकांत भारतीय – 30 मते
>> राम शिंदे – 30 मते
>> उमा खापरे – 27 मते
>> प्रसाद लाड – 28 मते
>> रामराजे नाईक निंबाळकर – 29 मते
>> एकनाथ खडसे – 28 मते
>> भाई जगताप – 26 मते
>> चंद्रकांत हंडोरे – 22 मते (पराभूत)
>> सचिन अहिर – 26 मते
>> आमशा पाडवी – 26 मते