पुणे : बारामती लोकसभेसाठी अडून बसलेल्या पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी आज सर्व सहा विधानसभा मतदार संघातील नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आपण संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मी 2008 साली पुरंदरला आलो. आधी मुंबईत होतो. पण इथली गरज लक्षात घेऊन मी इथे आलो. मी आमदारकी लढण्यासाठी इथे आलो. सर्व तरुणांनी माझी निवडणूक हातात घेतली होती. मोठ-मोठे पुढारी सांगत होते की मी काय करणार, पण मी आमदार झालो, 25 हजार मतांनी जिंकलो. सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखविला होता. आपण आता पवार रुपी हुकुमशाही संपविण्यासाठी धर्मयुद्ध पुकारल्याचे विजय शिवतारे यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात चिखल झाला आहे. राज्यातील जनतेला नवीन पर्याय हवे आहेत. पवार पर्व संपण्यासाठी मी लढत आहे. आम्ही का यांना मतदान करायचे अशी जनता मला बोलत आहे. लोक सांगत आहेत. आता माघार घेऊ नका. लोक माझ्या कानात येऊन सांगत आहेत, ही यांची भीती. जनतेचे छुपे आशीर्वाद मला आहेत. ही निवडणूक मी लढणारच. अनेक लोक माझ्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे लोक देखील मला पाठींबा देत आहेत. अजित पवार याचं राजकारण स्वार्थाचं आहे. म्हणून आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले.
आपण आता 1 तारखेला सभा घेणार आहोत. माझ्यासोबत कोणीच नसेल, ही जनसामान्याची लढाई आहे. 50 ते 60 हजाराची ही सभा असेल. लोक सांगत आहेत की अन्याय अत्याचार आम्ही सहन केला आहे. सगळ्या विधानसभा मतदार संघात आम्ही सभा घेणार आहोत. मी लोकांना आज आमंत्रित करीत आहे. 12 तारखेला दुपारी 12 वाजता आपण फॉर्म भरणार आहोत. यावेळी आम्ही रोड शो करणार असल्याचेही विजय शिवतारे यांनी सांगितले.
शरद पवार यांनी दहशतीचा उगम केला. राष्ट्रवादीने संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात दहशतवाद पेरला आहे. सत्तेचा गैरवापर यांनी केला आहे. संग्राम थोपटे यांचा कारखाना यांनी बंद पाडला आहे. विजय शिवतारे यांच्या माणसांना यांनी त्रास दिला आहे. ताई संसदेत 98 टक्के उपस्थित असतील. पण त्यांनी 2 टक्केही कामे केलेली नाहीत. असा निष्क्रीय खासदार आम्हाला मिळाला आहे. 2014 सालीच मी खासदार झालो असतो. पण तेव्हा यश आले नाही. मी सगळ्या नेत्यांना हात जोडून मी सांगतोय की ही लढाई मला लढू द्या. एका राक्षसाला संपविण्यासाठी दुसरा राक्षस नको उभा राहायला. हा विंचू आधी आम्हाला डसला आणि आता महादेवच्या (नरेंद्र मोदीच्या) पिंडीवर जाऊन बसला आहे अशी टीकाही विजय शिवतारे यांनी केली आहे.