मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची अखेर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे.विरोधीपक्षाने विजय वडेट्टीवार यांचं नाव एकमताने विरोधी पक्षनेतेपदी सुचवलं होतं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद हवे असेल, तर काँग्रेसने विधान परिषदेचे उपसभापती पद आम्हाला द्यावे, अशी मागणी भाजप-शिवसेनेने केली होती. युतीच्या या खेळीत यश आल्याने काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळालं. राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपकडून मंत्रिमंडळात समावेश केल्याने, विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा झाली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या विजय वडेट्टीवार यांची ओळख सभागृहाला करुन दिली. वडेट्टीवार यांना टोमणे मारत मुख्यमंत्र्यांनी ओळख करुन दिली.
“वडेट्टीवार हे अनेकवर्षे या सभागृहाचे ते सदस्य आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातही त्यांना संधी मिळाली होती. निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना काँग्रेसकडून संधी दिली जाते. मात्र निवडणूक संपल्यानंतर त्यांना बाजूला करुन दुसऱ्याला संधी दिली जाते. मात्र मला विश्वास आहे की आता विरोधी पक्षनेतेपद तुमच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे काँग्रेसने यापुढेही वडेट्टीवारांना संधी द्यावी” असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता दोन्ही विदर्भाचे
दरम्यान, विधानसभा नेतेपदी काँग्रसेने विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हापूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांना संधी दिली आहे. विजय वडेट्टीवर हेच विरोधी पक्षनेते असतील, हे निश्चित मानले जात होतं. आता त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं. राज्य सरकारच्या उरलेल्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मुख्यमंत्रीही विदर्भातील आणि विजय वडेट्टीवार यांच्या रुपाने विरोधी पक्षनेताही विदर्भातील आहे. हा अनोखा योगायोग म्हणावा लागेल.
कोण आहेत विजय वडेट्टीवार?
संबंधित बातम्या
विरोधी पक्षनेतेपद हवे तर उपसभापतीपद द्या, सत्ताधाऱ्यांकडून काँग्रेसची कोंडी