अहमदनगर : “चंद्रकांत पाटील हे चंपारण्यातील एक पात्र आहेत. ते नेहमीच भ्रमण करत असतात. त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ते थांबतात,” अशी खोचक टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. ते अहमदनगरमध्ये ”टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील तसेच भाजपला चांगलंच घेरलं. (Vijay Wadettiwar criticizes Chandrakant Patil on election)
चंद्रकांत पाटील पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात शुक्रवारी (25 डिसेंबर) बोलत होते. यावेळी बोलताना ‘पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्र मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेषत: मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे,’ असे वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय गोटात चांगल्याच प्रतिक्रिया उमटल्या. पाटलांच्या याच वक्तव्यावर बोलताना “चंपारण्यात एक पात्र आहे. हे पात्र नेहमी भ्रमण करतं त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ते थांबत आणि गैरसोय झाली की हे पात्र बदलतं. या पात्रामध्ये चंद्रकांत पाटील असावेत,” असे म्हणत वडेट्टीवार यांनी पाटलांवर खोचक टीका केली.
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटलांनी आपल्या कोल्हापूर मतदारसंघाऐवजी पुण्यातील कोथरुड येथून निवडणूक लढवली. कोथरुड येथून ते नवडूनही आले. मात्र, हाच विषय चंद्रकांत पाटलांना नेहमीच आडचणीचा ठरलेला आहे. मतदारसंघ बदलल्यामुळे सोयीच्या मतदारसंघातून निवडणूक लढवल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून केला जातो. त्यावर त्यांनी वेळोवेळी स्पष्टीकरणही दिलेलं आहे. पुण्यातील कार्यक्रमात बोलताना त्यांनी याच विषयाला हात घातला आणि कोल्हापुरातूनही निवडून येण्याची क्षमता असल्याचा दावा केला. त्यांच्या याच दाव्यामुळे चंद्रकांत पाटलांवर विरोधकांनी टीका केली आहे.
“मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
“चंद्रकांतदादांना पुणेकरांनी बोलावलंच नव्हतं. त्यांच्यामुळे भाजपच्या नेत्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झालेला आहे. बरं चंद्रकांत दादा पुण्यात आलेच आहेत तर मग एका वर्षातच परत जाण्याची भाषा का? असा सवाल करताना कोथरुडकरांनी त्यांना पाच वर्षासाठी निवडून दिलंय. उद्या जर कोथरुडकर काही काम घेऊन गेले तर मी परत जाणार आहे, असं चंद्रकांतदादा सांगणार आहेत का?”, अशी टोलेबाजी अजित पवार यांनी केली.
संबंधित बातम्या :
तुम्हाला बोलवलंच नव्हतं, परत जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांना अजित पवारांचा टोला
एकनाथ खडसेंवर वक्रदृष्टी का? ED नोटीस येण्याची 5 कारणे
भुजबळांचा संजय राऊतांना पाठिंबा, म्हणाले, ‘एकत्र लढलं तर भाजपाला रोखणे शक्य’
(Vijay Wadettiwar criticizes Chandrakant Patil on election)