नागपूर : महाविकास आघाडीचं सरकार सत्ताधारी कोण? विरोधक कोण हे पाहत नाही. नियम मोडल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला, असं मत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. मिटकरी यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना वडेट्टीवार बोलत होते. (Vijay Wadettiwar Statement on Amol Mitkari)
शासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटींचं नागरिकांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारने दिलेले आहेत. शिवजयंती साजरी करताना कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. यातून एकच सिद्ध होतं की महाविकास आघाडीचं सरकार सत्ताधारी कोण? विरोधक कोण हे पाहत नाही. नियम मोडल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला, असं वडेट्टीवार म्हणाले.
आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला शेकडो लोक उपस्थित होते. या मिरवणुकीत सरकारने घालून दिलेल्या कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवण्यात आले. या प्रकरणी दहीहंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 ते 400 जणांवर हा गुन्हा दाखल झालाय.
कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र कितीही सांगितलं तरी लोक विनामास्कचे फिरत आहेत. कुठलीही काळजी लोक घेत नाही. त्यामुळे आता काही कठोर पावलं उचलावी लागणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की यानंतर जर काळजी घेतली नाही तर कठोर पावलं उचलावी लागतील. नागरिकांनी मास्क लावावेत, गर्दी टाळावी. लग्न समारंभात गर्दी टाळण्यासाठी तसंच नियमाच्या अधिन राहून सोहळे व्हावेत, यासाठी आम्ही आता मंगल कार्यालयांवर करडी नजर ठेऊन नियमांचं न पालन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचं सुरु केलं आहे.
साधारणत: संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरु आहे. जर लोकांनी सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते. त्यासाठी त्या त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही तसे आदेश दिले आहेत. तेथील परिस्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.
(Vijay Wadettiwar Statement on Amol Mitkari)
हे ही वाचा :