मुंबई : यंदा शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा होणार का? दसरा मेळावा झालाच तर तो कोणाचा होणार, शिंदे गट की उद्धव ठाकरे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यंदा दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्यावरून आता राजकारण तापण्यास सुरुवात झालीये. यावर शिवसेना (Shiv Sena) नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे गट आणि भाजपाला (BJP) टोला लगावला आहे. सध्या विस्मृतीचं राजकारण सुरू आहे, दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेकडून केव्हाच पत्र पाठवण्यात आलं आहे. आधी परवानगी दिली आणि नंतर आता ते बदलले,अडचणी सांगण्यास सुरुवात केली असं राऊत यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे जे नियमात आहे तेच होईल, सरकार नियमाबाहेर जाऊन कोणतेही काम करत नसल्याची प्रतिक्रिया यावर बोलताना फडणवीसांनी दिली आहे.
शिवाजी पार्कमध्ये यंदा दसरा मेळावा होणार का? झाल्यास कोणाचा होणार यावर बोलताना विनायक राऊत यांनी शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे. सध्या विस्मृतीचं राजकारण सुरू झालं आहे. शिवसेना दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये मेळावा घेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून ही पंरपरा चालू आहे. यंदा देखील दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी केव्हाच पत्र पाठवण्यात आले आहे. त्यांनी आधी परवानगी दिली, मात्र आता पलटी खाल्ली आहे. राजकारणाची हद्द पार झालीये, नीच राजकारण सुरू असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना राऊत यांनी शिंदे गटाकडून गणेश मंडळांवर उधळपट्टी सुरू असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी खोके कमावले आहेत, मग आता खर्च तर होणारच. खर्च करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. यंदा फक्त मंडळांकडूनच उधळपट्टी होईल असं वाटत नाही. मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी निवडणूक कधीही झाली तर जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंनाच मिळेल असं राऊत यांनी म्हटलं आहे.