मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (Vinayak mete resign as a shiv smarak Chairman) दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचे कळवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी इच्छाही विनायक मेटेंनी व्यक्त केली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अमंलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदी 2015 पासून कार्यरत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार सत्तेवर आले असल्यामुळे आपल्या विचारानुसार इतर विकासाची कामे होणे अपेक्षित आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुद्धा आपल्या विचाराने व्हावे म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अमंलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. कृपया आपण राजीनामा स्विकारावा ही विनंती.
तसेच आपल्या नेतृत्वाखाली महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होवो ही सदिच्छा व्यक्त करत असतानाच या कार्यक्रमासाठी माझी काही आवश्यकता भविष्यामध्ये लागल्यास माझे सहकार्य हे सदैव राहील,” असे विनायक मेटे यांनी पत्रात नमूद केले (Vinayak mete resign as a shiv smarak Chairman) आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक अरबी समुद्रात उभारले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यासंबंधी शासकीय आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरु आहे. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा उभा पुतळा उभारण्यात आला आहे. तसाच पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्याचा मानस महाराष्ट्र सरकारचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा पुतळा करायचा ठरल्यास, त्याची उंची 153 मीटर करण्याचा विचार आहे. सरदार पटेलांच्या 152 मीटरच्या पुतळ्यापेक्षा एक मीटरने उंच पुतळा शिवरायांचा करण्याचा विचार असून, सध्या प्रस्तावानुसार शिवस्मारकाचा पुतळ्याची उंची 123.2 मीटर, तर चबुतरा 88.8 मीटर आहे.