रत्नागिरी : खंबाटा एव्हिएशन प्रकरणाचा मुद्दा रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत चांगलाच तापताना दिसत आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी माजी खासदार निलेश राणेंच्या आरोपांचे खंडन केले. तसेच बंधूंकडून नीट माहिती घेऊन आरोप करण्याचा सल्लाही निलेश राणेंना दिला आहे. त्यात कंपनीतील कामगारांनीही या लोकसभा निवडणुकीत थेट विनायक राऊत यांच्याविरोधातच प्रचाराचे हत्यार उपसल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आपल्यावरील आरोपांचे खंडन करताना खासदार विनायक राऊत म्हणाले, ‘खंबाटा एव्हिएशनमध्ये 3 कामगार संघटना कार्यरत होत्या. त्यामध्ये भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना आणि ऑफिसर्स असोसिएशन संघटना यांचा समावेश होता. 2010 आणि 2014 मध्ये करार झाले त्यावेळी त्या करारांवर महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या अध्यक्षांचीही सही होती. ही समर्थ कामगार संघटना कोणाची आहे हे सर्वश्रुत आहे. निलेश राणे यांनी आरोप करण्यापूर्वी आपल्या बंधूंकडून त्याबाबत व्यवस्थित माहिती घ्यावी आणि मगच आरोप करावे”. यावेळी राऊत यांनी व्यवस्थापनाचा बेशिस्तपणा आणि मालकाचं दुर्लक्ष यामुळेच खंबाटा बंद पडल्याचेही स्पष्ट केले.
सध्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बंद पडलेल्या खंबाटा एव्हिएशन कंपनीवरून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राजकीय रान पेटताना पाहायला मिळत आहे. 2 दिवसांपूर्वीच कंपनीतील कामगारांना एकत्र आणत महाराष्ट्र स्वाभिमान संघटनेने विनायक राऊत यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे खंबाटा एव्हिएशन कंपनीतील समर्थ कामगार संघटनेचे नेतृत्व नितेश राणेंकडे होते, असे सांगत या प्रकरणाला कलाटणी देण्याचाही प्रयत्न होतोय.
खंबाटा एव्हिएशन कंपनी अचानक बंद
खंबाटा एव्हिएशन कंपनीत भारतीय कामगार सेनेची अधिकृत युनियन होती. या युनिटची जबाबदारी विनायक राऊत यांच्यावर होती. यात जवळपास 70 टक्के कामगार मराठी आणि विशेषतः कोकणातील आहेत. खंबाटा एव्हिएशनमध्ये भारतीय कामगार सेना ही मान्यतापात्र युनियन होती. त्या युनिटची जबाबदारी खासदार विनायक राऊत यांच्यावर होती. मात्र, अडीच वर्षांपूर्वी ही कंपनी बंद पडली. यातील कामगारांना वर्ष-वर्ष पगार मिळाले नाहीत. आता या कंपनीतील कामगार देषोधडीला लागले आहेत. खंबाटा एव्हिएशन कंपनीतील कामगारांनी रत्नागिरीत थेट पत्रकार परिषद घेऊन कंपनी बंद पडण्याला खासदार विनायक राऊतच जबाबदार असल्याचा आरोप केला. आतातर कंपनीतील कामगारांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात जाऊन प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातील निवडणूक पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेत
खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात खंबाटा एव्हिएशन कंपनीतील कामगारांनी आता ब्रम्हास्त्र उगारले आहे. खंबाटाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा पुरावा दाखवत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी खंबाटा एव्हिएशन कंपनी बंद होण्यामागे मोठा भष्ट्राचार असल्याचा आरोप केला. राणे यांनी खंबाटा प्रकरणावरून खासदार विनायक राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
संबंधित बातम्या
‘खंबाटा एव्हिएशन’ कामगारांचा खासदार विनायक राऊतांविरोधात एल्गार