मुंबई: निवडणुकीच्या धामधुमीत सोशल मीडियावर मेसेजचा महापूर सुरु आहे. सोशल मीडियातून अनेक पद्धतीने प्रचार-अपप्रचार सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
काय आहे सत्य?
सध्या निवडणुकीचा प्रचार हा सभा, रॅलींमधून असा होत असला, तरी सोशल मीडियावर तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होत आहे. नेटकरी प्रत्येक उमेदवार किंवा राजकीय पक्षांबाबत आपले विचार मांडत आहे. पण अनेकजण आपल्याला आलेल्या मेसेजची सत्यता न पडताळता तो फॉरवर्ड करतात. असाच मेसेज आहे नागराज मंजुळेबाबत. नागराज मंजुळेंनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला, असं नेटकऱ्यांनी जाहीर करुन टाकलं. पण हे खरंच घडलं आहे का, याचा विचारसुद्धा केला नाही. – (पुढे वाचा)
वंचित बहुजन आघाडीचं स्पष्टीकरण
या मेसेजनंतर खुद्द वंचित बहुजन आघाडीने याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. नागराज मंजुळे यांनी वंचित बहुजन आघाडीत कोणताही प्रवेश केलेला नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितलं.
निवडणुकीमध्ये सोशल मीडिया मोठी भूमिका बजावत आहे. मेसेज, व्हिडीओ, इमेजद्वारे अनेकजण आपआपला प्रचार करत आहेत. मात्र कोणतेही मेसेज फॉरवर्ड करताना एकदा सत्यता पडताळणं आवश्यक आहे.