औरंगाबाद : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Assembly Election) प्रचाराचा ज्वर प्रचंड आहे. सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करुन घेण्यासाठी आपल्या प्रचारसभांद्वारे सभा घेत आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने (AIMIM) देखील महाराष्ट्रात आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. अशातच प्रचारादरम्यान एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi Dance) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ओवेसी चांगलेच मुडमध्ये असून गाण्याच्या ठेक्यावर डान्स (Asaduddin Owaisi Dance) करताना दिसत आहेत. औरंगाबादमधील पैठण गेट परिसरात प्रचारसभा घेतल्यानंतर त्यांनी हा डान्स केल्याचं सांगितलं जात आहे.
Maharashtra: AIMIM Chief Asaduddin Owaisi performs a dance step after the end of his rally at Paithan Gate in Aurangabad. (17.10.2019) pic.twitter.com/AldOABp2yd
— ANI (@ANI) October 18, 2019
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत असदुद्दीन ओवेसी प्रचारसभेला संबोधित केल्यानंतर मंचावरुन खाली उतरत आहेत. त्यावेळी सभेच्या ठिकाणी “मिया मिया, मिया भाई” हे गाणं लागतं. ते ऐकून ओवेसी पायऱ्या उतरत असतानाच काही सेकंद त्यावर ठेका धरत नाचत आहेत. यावेळी ओवेसी यांच्या हातात फुलांचा हारही दिसत आहे.
औरंगाबाद येथील सभेत ओवेसी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1993 मधील मुंबई दंगलीवरील श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल स्विकारायला हवा, अशीही मागणी केली. मोदी आपल्या प्रचारातील भाषणांमध्ये विवादास्पद विषयांवर वक्तव्य करत आहेत. त्यातून त्यांना समाजातील एका घटकाला विशिष्ट संदेश द्यायचा आहे, असाही आरोप त्यांनी केला.
ओवेसी म्हणाले, ‘‘मागील सरकारांनी 1993 च्या मुंबई स्फोटातील पीडितांना न्याय दिला नसल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. हे प्रकरण आता बंद झालं आहे. आरोपींना शिक्षाही झाली आहे. मात्र, मुंबई दंगलीवरील श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. पंतप्रधान मोदी यावर कधी काम करणार आहेत?”