मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे (Maharashtra Assembly Election). युती आणि आघाडी दोघेही आपआपल्या परिने त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसमोर संकट उभं राहिलं आहे. नासासोपारा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे शिवसेनेचे पदाधिकारी प्रमोद दळवी यांना पोलिसांनी फसवणुकीप्रकरणी दोन दिवसांची नोटीस बजावली आहे (Shivsena Pramod Dalvi Notice). त्यामुळे शिवसेनेसमोर आता नवं आव्हानं निर्माण झालं आहे.
शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांना बुधवारी (10 ऑक्टोबर)पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्यावर अनधिकृत इमारत बांधकाम, बोगस कागदपत्रा द्वारे ग्राहक आणि शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे (Shivsena Pramod Dalvi Notice). याच प्रकरणी काल पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यामुळे विरारमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवसेनेचे विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांच्यावर मौजे विरार सर्वे न 250 हिस्सा नंबर 3/2 या जागेत चार मजली अनधिकृत इमारत बांधून, कागदपत्रात हेराफेरी करत ग्राहक आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या 25 सप्टेंबरला विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’ चे प्रभारी साहाय्यक आयुक्त रागेश राठोड यांनी हा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बुधवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास विरार नालासोपारा लिंक रोडवरून पोलिसांनी प्रमोद दळवी यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची चौकशी करुन त्यांना दोन दिवसांच्या नोटीसवर सोडण्यात आलं आहे.
यावेळी विरारमध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं होतं. ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेचे नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या समर्थकाला अटक केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर जमले होते.
कोण आहेत प्रमोद दळवी?
प्रमोद दळवी हे बिल्डर, व्यावसायिक आणि शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचे नालासोपारा विधानासभेतून निवडणूक लढविण्याचे निश्चित झाल्या नंतर मागच्या 2 महिन्यापासून शर्मा यांची प्रचार यंत्रणेतील महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे. दहीहंडी, गणेशोत्सव मध्ये त्यांनी शर्माच्या समर्थनार्थ टी शर्ट, उत्सवातील बॅनर त्यांच्याच माध्यमातून वाटण्यात आले. ऐन निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत दळवी यांना अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.