रायगड : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 जागांसाठी 57 टक्के मतदान झालंय. या 17 जागांमध्ये सर्वात लक्ष लागलेली लढत म्हणजे मावळची जागा आहे. इथे पवार कुटुंबातली तिसरी पिढी म्हणजे पार्थ पवार निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्यासमोर शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचं आव्हान आहे. मावळ मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील तीन तालुके येतात आणि याच तीन तालुक्यांवर पार्थ पवारांची मदार असल्याचं बोललं जातं. या तीनही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला?
मावळ मतदारसंघात एकूण अंदाजे 58.21 टक्के मतदान झालंय. अंतिम आकडा अजून जाहीर केला जाणार आहे. पण सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, पनवेल, उरण आणि कर्जत या विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालंय. मावळ मतदारसंघात पनवेल, उरण, कर्जत, चिंचवड, पिंपरी आणि मावळ हे मतदारसंघ येतात. यापैकी कर्जत, पनवेल आणि उरणमध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलंय. यावर टीव्ही 9 मराठीने राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड आणि भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी चर्चा करुन वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला याचा अंदाज जाणून घेतलाय.
विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी
पनवेल – 55.30 टक्के
कर्जत – 60.40 टक्के
उरण – 61.80 टक्के
मावळ – 61.28 टक्के
चिंचवड – 57.30
पिंपरी – 56.30
एकूण – 58.21 टक्के
राष्ट्रवादी आणि भाजप आमदारांचं म्हणणं काय?
कर्जत, उरण आणि पनवेल मतदारसंघातील मतदान वाढण्याला विशेष महत्त्व आहे. राष्ट्रवादीचे कर्जतचे आमदार सुरेश लाड यांच्या मते, उरणमध्ये जे मोठ्या प्रमाणात मतदान झालंय, त्याचा फायदा पार्थ पवार यांना होणार आहे. कर्जतमधील जास्तीत जास्त फायदा पार्थ पवार यांना होणार असल्याचा दावा लाड यांनी केला. तर महाआघाडीमध्ये असलेल्या शेकापनेही उरणमध्ये जोर लावला होता.
भाजप आमदार प्रशांत ठाकूर हे उरण आणि पनवेल मतदारसंघात भाजपचे सर्वात मोठे नेते आहेत. शिवाय त्यांचे इतर पक्षातील नेत्यांशीही चांगले संबंध आहेत. त्यांच्या मते, पनवेलमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा हा ‘मजबूत सरकारसा’ठी होईल. पनवेलकरांनी ‘मजबूत सरकारसा’ठी मोठ्या प्रमाणावर मतदान केलंय. कर्जतचा फायदा राष्ट्रवादीला होणार असा दावा केला जात असला तरी पनवेलमधील मतदारांची संख्या जास्त असल्याचं प्रशांत ठाकूर यांचं म्हणणं आहे. टक्केवारीच्या बाबतीत कर्जत आणि उरणची टक्केवारी जास्त आहे. पण मतदारांची लाखांमध्ये संख्या लक्षात घेता पनवेलमधील मतदार अधिक आहेत, असं ते म्हणाले. पनवेलमध्ये ग्रामीण आणि शहरी भाग येतो, या दोन्ही भागातून मोठ्या प्रमाणात मतदान झालंय आणि याचा फायदा ‘मजबूत सरकारसा’ठी होईल, असा दावा त्यांनी केलाय.