नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यातील 59 जागांवर आज मतदान पार पडत आहे. या टप्प्यातील दिल्लीतील 7, हरियाणातील 10, उत्तरप्रदेश 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ जागांवर आज मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात तब्बल 979 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून 10 कोटी 16 लाखांपेक्षा अधिक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. इतर टप्प्यांप्रमाणे निवडणुका सुरळीतपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाने 1.13 लाखांहून अधिक मतदान केंद्रे उभारली आहेत.
सध्या मतदान सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात प्रमुख सहा लढती पाहायला मिळणार आहे. त्यातील प्रमुख लक्षवेधी लढत म्हणजे भोपाळ लोकसभा मतदारसंघ. या लोकसभा मतदारसंघातून मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात प्रज्ञा सिंह लोकसभा निवडणूक लढत आहे.
तर राजधानी दिल्लीत भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिहेरी लढत पाहायला मिळत आहे. यात पूर्व दिल्लीतून भाजपकडून माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गौतम गंभीर यांचा सामना आपच्या आतिशी मारलेना आणि काँग्रेसचे अरविंदर सिंह लवली यांच्याशी होत आहे. तर उत्तर पूर्व दिल्लीतून काँग्रेस नेत्या शीला दीक्षित विरुद्ध भाजपचे मनोज तिवारी मैदानात उतरले आहेत. तसेच उत्तर पूर्व दिल्लीतून भाजपकडून हंसराज हंस, काँग्रेसकडून के. राजेश लिलाठिया आणि आपचे गुग्गन सिंह यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
त्याशिवाय उत्तरप्रदेशातील आझमगढ या लोकसभा मतदारसंघातून सपाकडून अखिलेश यादव विरुद्ध भाजपचे दिनेश यादव उर्फ निरहुआ मैदानात उतरले आहेत. तर मध्यप्रदेशातील गुना या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया विरुद्ध भाजप नेते के.पी. यादव अशी लढत पाहायला मिळणार आहे.
‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
या टप्प्यात केंद्रीय मंत्री मनेका गांधी, राधा मोहन सिंह, डॉ हर्षवर्धन, कृष्णपाल गुर्जर, राव इंदरजित सिंह, नरेंद्र सिंह तोमर यांसह गौतम गंभीर, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, निरहुआ, मनोज तिवारी या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
त्याशिवाय काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह, कीर्ती आझाद, शीला दीक्षित, विजेंदर सिंह, भूपिंदरसिंह हुडा व समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव या दिग्गजांचेही राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रांत बंद होणार आहे.