मुंबई : एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपला राज्यात 36 ते 40 जागा मिळताना दिसत आहेत. अंतिम निकालामध्ये चित्र स्पष्ट होईलच, पण राज्यातील काही जागा अशा आहेत, जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व पणाला लागलंय. जर इथे पराभव झाला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागणारा तो पराभव असेल. महाराष्ट्रातील तीन जागा हायप्रोफाईल लढती आहेतच, शिवाय राज्यातील पुढील राजकारणाची दिशाही ठरवणार आहेत.
बारामती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत भाजपने 2014 मध्ये पहिल्यांदाच आव्हान उभं केलं. यावेळीची कांचन कुल यांना उमेदवारी देत भाजपने खेळी खेळली. राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी गावागावात जाऊन प्रचार केला. भाजपनेही पूर्ण ताकद पणाला लावली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे बारामतीत तळ ठोकून होते. बारामतीतून सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत दोन वेळा निवडणूक जिंकली आहे. तिसऱ्या टर्मसाठी बारामतीतही धाकधूक वाढली आहे.
मावळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून निवडणूक रिंगणात उतरवलंय. अजित पवारांनी या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मावळ मतदारसंघात रायगडमधील उरण, कर्जत आणि पनवेल हे किंमगमेकर विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे पार्थ पवारांची मदार ही रायगड जिल्ह्यातील मतदारसंघावर असेल. कारण, मावळ भागात भाजप आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे. यावेळी पवार कुटुंबाचा पराभव करणारच असा पण शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केलाय.
नांदेड
महाराष्ट्रात काँग्रेसचा चेहरा असलेले प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही धाकधूक वाढली आहे. कारण, भाजपने नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलंय. अशोक चव्हाणांना प्रचारासाठी जिल्ह्याच्या बाहेरही जाता आलं नव्हतं. अशोक चव्हाणांना नांदेडमध्ये रोखून धरण्यात तर भाजपने यश मिळवलं, पण निकाल काय असेल ते लवकरच स्पष्ट होईल. भाजपकडून इथे प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.
संबंधित बातम्या :