वर्धा : विदर्भातील सात जागांसाठी 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार आपल्या प्रचारात व्यस्त आहेत. मात्र वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय ओस पडलेलं दिसतंय. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला वर्धा सध्या भाजपाने हस्तगत केलाय. काँग्रेसमधील गटबाजी या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी कारणीभूत ठरली आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा 5 एप्रिलला वर्ध्यात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ज्या मैदानावर झाली, त्याच मैदानावर राहुल गांधींची सभा होणार आहे. पण दोन दिवसांवर सभा आलेली असतानाही जिल्ह्यात काँग्रेसचा प्रचार थंडावल्याचं चित्र आहे. आजही जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालायत कार्यकर्ते येतच नसल्याचं लक्षात येतंय. काही दिवस तर या कार्यालयाला कुलूपच लागून होतं. आता मात्र निवडणुकीला काही दिवस उरले असताना कार्यालयातील हा शुकशुकाट बोलका ठरत आहे.
वर्ध्यात भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस, तर काँग्रेसकडून चारुलता टोकस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील सात जागांसाठी काँग्रेस वर्ध्यात सभा घेत आहे. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने विदर्भातील सर्वच्या सर्व जागा गमावल्या होत्या. गेल्या पाच वर्षातही काँग्रेसचे नेते विदर्भात सक्रिय दिसले नाही. आता निवडणुकीच्या तोंडावरही काँग्रेस सुस्त असल्याने स्थानिक पातळीवरील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.
राहुल गांधीं महाराष्ट्रातील प्रचाराला 5 एप्रिल रोजी सुरुवात करतील. वर्ध्यात सायंकाळी चार वाजता त्यांची सभा आहे. त्यापूर्वी ते पुण्यात महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. एकाच दिवसात महाराष्ट्रातील दोन ठिकाणं कव्हर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पुण्यातही मोठ्या गोंधळानंतर मोहन जोशी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.