काँग्रेसला आम्ही 40 जागा द्यायला तयार, वंचित बहुजन आघाडीचा अल्टीमेटम

| Updated on: Jul 03, 2019 | 4:11 PM

काँग्रेसला आम्ही 40 जागा द्यायला तयार आहोत, त्यांनी याबाबतचा निर्णय 10 दिवसांच्या आत कळवावा, अन्यथा 288 जागा लढण्यासाठी सक्षम आहोत, असंही वंचितने म्हटलंय. वंचितच्या वतीने अण्णा राव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

काँग्रेसला आम्ही 40 जागा द्यायला तयार, वंचित बहुजन आघाडीचा अल्टीमेटम
Follow us on

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसलाच अल्टीमेटम दिलाय. काँग्रेसकडून अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. सर्व काही बातम्यांमधून समजतंय. पण काँग्रेसला आम्ही 40 जागा द्यायला तयार आहोत, त्यांनी याबाबतचा निर्णय 10 दिवसांच्या आत कळवावा, अन्यथा 288 जागा लढण्यासाठी सक्षम आहोत, असंही वंचितने म्हटलंय. वंचितच्या वतीने अण्णा राव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

जी काँग्रेस आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन काही जागा देण्याचा विचार करत होती, त्याच काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीने आता अल्टीमेटम दिलाय. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जास्त मतं मिळाली होती, हे कारण देत वंचितने हा अल्टीमेटम दिला. येत्या 10 दिवसात काँग्रेसने निर्णय न कळवल्यास स्वबळावर लढणार असल्याचंही वंचितने म्हटलंय.

काँग्रेसला कोणत्या 40 जागा हव्यात ते सांगावं, असंही वंचितने स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीत आम्हाला काँग्रेसपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. त्यामुळे त्यांना किती जागा द्यायच्या ते ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे, असं वंचितच्या वतीने अण्णा राव पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असा आरोपही काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या काळात केला होता. निवडणुकीत आम्हाला 41 लाख मतं मिळाली आहेत. त्यामुळे याबाबत काँग्रेसने खुलावा करावा, असंही अण्णा राव पाटील म्हणाले. 2014 आणि 2019 ची परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेस आणि भाजपात तिकीट मिळणार नसलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला.