Shiv Sena : शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्या, शिंदे गटाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

| Updated on: Jul 20, 2022 | 11:10 AM

Shiv Sena : या पत्रात शिंदे गटाकडे किती आमदार आणि खासदार आहेत याची माहिती दिली आहे. तसेच शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून मुख्य नेते हे नवे पद निर्माण करण्यात आल्याची माहितीही या याचिकेत देण्यात आली आहे.

Shiv Sena : शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्या, शिंदे गटाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटाने आता थेट निवडणूक आयोगाकडे (election commission) धाव घेतली आहे. आमच्या गटाला शिवसेना (Shiv Sena) म्हणून मान्यता द्या, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. तसे पत्रच या गटाने निवडणूक आयोगाला दिलं आहे. आमच्याकडे दोन तृतियांश संख्याबळ आहे. 50 आमदार आणि 12 खासदारही आमच्याकडेच आहेत. त्यामुळे आमच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या या पत्राआधीच शिवसेनेनेही निवडणूक आयोगाला एक पत्रं दिलेलं आहे. शिंदे गटाकडून कोणताही दावा केला गेल्यास आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी विनंती शिवसेनेने निवडणूक आयोगाला केली होती. त्यात आता शिंदे गटाकडून दाव्याचं पत्रं आल्याने निवडणूक आयोग काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने केलेल्या या दाव्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्लीत आले होते. त्यावेळी ते निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यांनी काल निवडणूक आयोगाची भेट घेतली नाही. शिवसेनेच्या 12 खासदारांसोबत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीतच निवडणूक आयोगाकडे शिवसेना म्हणून मान्यता मिळवण्याचा आणि निवडणूक चिन्ह आपल्याकडे घेण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं जात. त्यानंतर शिंदे हे मुंबईकडे आले. मात्र, आज शिंदे गटाने थेट निवडणूक आयोगाकडे जाऊन पत्र देऊन शिवसेनेवर दावा केला आहे.

हे सुद्धा वाचा

कार्यकारिणी बरखास्त केल्याचा दावा

या पत्रात शिंदे गटाकडे किती आमदार आणि खासदार आहेत याची माहिती दिली आहे. तसेच शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून मुख्य नेते हे नवे पद निर्माण करण्यात आल्याची माहितीही या याचिकेत देण्यात आली आहे. तसेच नव्या कार्यकारिणीने निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देते त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चिन्हं गोठवणार?

दरम्यान, शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडूनही निवडणूक आयोगाला पुरावे सादर करून शिवसेनेवर दावा केला जाऊ शकणार आहे. त्यामुळे दोन्ही गटाच्या भांडणात धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हं गोठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.