सांगली : काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन पंतप्रधान मोदी यांच्याबाबत भूमिका मांडणे चुकीचे आहे. राहूल गांधी यांनी रफेलच्या मुद्यावर आरोप केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली. त्यामुळे त्यांनी प्रधानमंत्र्यांवर वारंवार आरोप करु नये. संसद भवन बांधण्यात प्रधानमंत्र्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे एनडीएने ठरवलं नविन संसद भवनाचं उद्घाटन मोदी यांची हस्ते करावं. विरोधकांनी कितीही टिका केली तरी आम्ही मजबूत आहोत. २०२४ ला सत्तेत आम्हीच येणार. कितीही विरोधक एकत्र आले तरिही नरेंद्र मोदी यांना हरवणे सोपं नाही. भारतीय संविधानात सर्व धर्माचा सन्मान आहे. संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात इतर धर्माचा अपमान नाही. नव्या संसद भवनाला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं तर आनंद होईल, असे विधान केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय.
ओडीसात रेल्वेचा अपघात झाला ही घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश सीबीआयला दिले आहेत. या अपघातात आतंकवाद्यांचा हात आहे की आणखी कोण दोषी आहे याचा तपास सीबीआय करणार आहे. काग्रेसने रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ही राजकीय मागणी आहें. राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नाही, असे अपघात होऊ नये यासाठी काँग्रेसने सुचना द्याव्या, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी अमित शहा यांनी ग्रिन सिग्नल दिलाय. आठ दिवसांत हा विस्तार होईल. महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार चांगलं काम करत आहे. राज्य सरकारने घेतलेले निर्णय सामान्यांना न्याय मिळेल असे आहेत. राज्यात लवकरच विस्तार होणार आहे. राज्यात मंत्रीमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद मिळावं अशी आमची मागणी आहे. महाविकास आघाडीने एक दुसऱ्यांवर आरोप करणं थांबवलं तर ते एकसंघ राहील.
येणाऱ्या सर्व निवडणूकीत रिपब्लिकन पक्ष भाजप- सेनेसोबत राहिल. रिपब्लिकन पक्षाला योग्य जागा मिळाव्या अशी मागणी आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला दोन ते तीन जागा हव्या आहेत. लोकसभेच्या दोन जागा निवडून आल्या तर आम्हाला राज्याची मान्यता मिळेल. दोन जागा निवडून याव्यात यासाठी शहा, फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. तर, विधानसभेला १५ जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. संधी मिळाली तर शिर्डी येथून लोकसभा लढायची इच्छा आहे, आगामी निवडणूक आम्ही कमळ चिन्हावर नाही तर स्वतःच्या चिन्हावर लढणार, असे ते म्हणाले.