नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केल्यानंतर इतर खेळाडूंनाही पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. टीम इंडियाचा विद्यमान यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी लवकरच निवृत्ती घेऊन भाजपात येणार असल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री संजय पावसान यांनी केलाय. याबाबत धोनीशी अनेकदा चर्चा झाली असल्याचंही त्यांनी ‘आज तक’शी बोलताना सांगितलं.
धोनीने अनेक वर्षांपासून देशाची सेवा केली आहे. त्याने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन समाज आणि देशसेवेसाठी राजकारणात यावं, असंही संजय पासवान म्हणाले. धोनीशी याबाबत चर्चा झाली असून तो सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पक्षाच्या संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी धोनीची भेट घेतली होती.
धोनीसोबतच इतर सेलिब्रिटींवरही लक्ष असल्याचं संजय पासवान म्हणाले. क्रीडा, सिनेमा, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना भाजपात आणणं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं. धोनी सध्या भारतीय संघात खेळत असून विश्वचषकात त्याने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. शिवाय त्याने स्वतःहून निवृत्तीबाबत कधीही भाष्य केलेलं नाही.
धोनीला राजकारणात येण्यापूर्वी निवृत्ती जाहीर करावी लागेल. यानंतरच त्याला राजकारणात नशिब आजमावता येईल. धोनीच्या अगोदर अनेक खेळाडूंनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. पंजाबमध्ये काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री असलेले नवज्योत सिंह सिद्धू यांनीही भाजपातूनच राजकारणाची सुरुवात केली होती. तर या लोकसभा निवडणुकीवेळी गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केला आणि खासदारही झाला. चेतन चौहान हे देखील अनेकदा भाजपचे खासदार राहिले असून सध्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत.