कोल्हापूर : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena leader Pratap Sarnaik) यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र ही सुद्धा भाजपची चाल आहे, असा दावा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांनी भूमिका मांडली. प्रताप सरनाईकांच्या पत्रावरुन महाविकास आघाडीमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये असंही मुश्रीफांनी नमूद केलं.
सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहेत असा आरोप प्रताप सरनाईकांनी केला आहे. त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले, “सरनाईकांनी असा आरोप केला असला तरी राज्यात कुठेही तशी परिस्थिती नाही. कोल्हापूर जिल्हापरिषद गोकुळमध्ये शिवसेनेला संधी दिली. काही ठिकाणी स्थानिक प्रश्नावरून कुरबुरी झाल्या असतील याचा अर्थ फोडाफोडी चालली आहे असा नाही. प्रताप सरनाईक यांचं हे कारण जुजबी असावं”
भाजपकडून सुडाचं राजकारण सुरु आहे. शिवसेनेचे वाघ अशा धमक्यांना घाबरणारे नाहीत. भाजपकडून ज्या धमक्या दिल्या जात आहेत, त्याला सेना घाबरणार नाही, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या पत्रामुळे राजीनामा द्यावा लागला, पण आज ही परमवीरसिंह अजूनही मोकाट आहेत. परमबीर सिंह यांना रिपोर्ट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते, मग परमवीर सिंह मोकाट कसे, असा प्रश्न हसन मुश्रीफ यांनी विचारला.
सरकार स्थापन होत असताना असा काही करार झालाय का एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत, वगैरे, असा प्रश्न हसन मुश्रीफ यांना विचारण्यात आला. त्यावर मुश्रीफ म्हणाले, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कार्यकर्ते आम्ही फोडतोच, त्यासाठी आम्हाला फुल्ल परवानगी आहे. परंतु शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे”
ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक यांनी केला आहे.
संबंधित बातम्या
काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करतेय, भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब
प्रताप सरनाईक यांचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं; वाचा संपूर्ण पत्रं जसच्या तसं