मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गरज असल्याचं मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी व्यक्त केलंय. शरद पवार यांचा दांडगा अनुभव उपयोगी येईल, त्यांच्या अनुभवाचं उदाहरण म्हणजे उत्तराखंड आणि गुजरातमधील पूर आपण पाहू शकतो. राजकीय द्वेष बाजूला ठेवून सध्या समाजहित गरजेचं असल्याचंही ते (NCP Jitendra Awhad) म्हणाले.
किल्लारीला भूकंप झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वर्षा बंगल्यावर असलेले तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मंत्र्यांना कामाला लावलं. उद्ध्वस्त झालेलं किल्लारी पुन्हा उभं केलं. सांगली आणि कोल्हापुरातही शरद पवारांची गरज आहे. प्रशासनाला जो आदेश द्यावा लागतो, जी यंत्रणा राबवावी लागते आणि नैसर्गिक आपत्तीनंतरचं जे नियोजन असतं, त्यात शरद पवारांचा दांडगा अनुभव आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
सर्वांनी पुढे येऊन हातभार लावण्याची गरज : शरद पवार
माझ्या राजकीय कारकीर्दीत कधीही असा पूर पाहिला नव्हता. यामध्ये सर्वसामान्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतीमधील माती वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर राज्य सरकारने तातडीने लोकांना मदत देण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले. यासाठी सर्वांनी पुढे येऊन गरज करावी, महाराष्ट्राची ही परंपरा आहे, असं आवाहनही शरद पवारांनी केलं.
मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाला भेट
सांगली आणि कोल्हापुरातील पूर हटवण्यासाठी केंद्र सरकारही सक्रिय झालंय. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी घेतलाय. हा विसर्ग दोन लाखांहून पाच लाख करण्यात येणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि येदियुरप्पा या दोघांनाही फोन केल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. पूरग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली.