शिर्डी : आम्ही कुठंही मातोश्री किंवा शिवसेना भवनवर (shivsena bhavan) दावा केलेला नाही. केवळ बाळासाहेबांशी नातं असल्याने आपला मान जपला जाईल. मात्र शिवसैनिक जगले पाहिजे. ते आहेत म्हणून पक्ष आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde) सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांचा विचार मी शिवसैनिकांना शिकवला पाहिजे असं अजिबात नाही. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मातोश्रीचा मोठेपणा टिकवणं गरजेचं आहे, असा सल्ला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिला. पक्षाची घटना म्हणजे देशाची घटना असं काहीजणांना वाटतंय. संजय राऊत यांच्या मेंदूत कन्फ्यूजन आहे. संजय राऊत पन्नास टक्के शिवसेनेचे तर पन्नास टक्के राष्ट्रवादीचे आहेत. केवळ बाळासाहेबांवर प्रेम केलं म्हणजे तो शिवसैनिक होत नाही. जो शिवसेनेवर आणि राष्ट्रवादीवर प्रेम करतोय त्याला नवीन व्याख्या द्यावी लागेल, अशा शब्दात दीपक केसरकर यांनी राऊतांवर जोरदार टीका केली.
दीपक केसरकर हे शिर्डीत आले होते. साईबाबांचे दर्शन घेत त्यांनी मध्यान्ह आरतीलाही हजेरी लावली. कोर्टात आज आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होती. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. पण सत्यमेव जयते म्हटलं जातं. शेवटी सत्याचा विजय होईलच, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. आज निवडणुक आयोगाने आमचा अर्ज दाखल करून घेतला असून सर्व छोटे मोठे अडथळे दूर होतील, असंही ते म्हणाले.
आज शिवसेनेत जी लढाई सुरू आहे ती वेगळ्या दिशेने जायला नको होती. मात्र आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबत आपण जाणार नाही, या बाळासाहेबांच्या विचाराला पुढे घेऊन जात आहोत, असं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात आता स्थिर सरकार आहे आणि जनतेलाही हेच हवं होतं. कोण मुख्यमंत्री आहे याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं. शिंदे गटाने सुरू केलेली लढाई वेगळ्या दिशेने जायला नको होती. आम्ही पंच्याहत्तर टक्के लोकांनी जी भूमिका घेतलीय याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारधारेच्या मतावर आम्ही निवडून आलेलो नव्हतो. त्यामुळे जनतेच्या मनात असलेलं सरकार फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी आणलं, असं सांगतानाच ही लढाई कुठून सुरू आहे हे आपल्याला माहीत आहे आणि ही लढाई तेच थांबवू शकतात, असा टोला त्यांनी राऊतांचं नाव न घेता लगावला.
आपल्या भोवती जे कोंडाळं असतं याचा आपण कधीतरी वेध घ्यायला हवा. बाळासाहेबांच्यामध्ये येण्याची कुणाची हिंमत नव्हती. मी एकटा राहिलो तरी चालेल मात्र काँग्रेससोबत जाणार नाही. हा विचार बाळासाहेबांचा होता. तोच पुढे घेऊन आम्ही चाललोय. आम्ही काँग्रेसच्या पुढे झुकावं का? हा प्रश्न आहे, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
निवडणूक आयोगाकडे दिलेल्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. आमची बाजू आम्ही मांडणार आहोत. मात्र एखाद्या गोष्टीला खूप वेळ केला तर काय परिस्थितीला सामोरे जावं लागतं याचे महाराष्ट्र उत्तम उदाहरण आहे. आज शिवसैनिक नक्कीच नाराज असतील. कारण एकाच पक्षात लढाई सुरू आहे. परंतु, बाळासाहेबांच्या विचारासाठी हा संघर्ष सुरू असून कितीही क्लेशदायी असला तरीही संघर्ष केला जाईल. सर्व गोष्टी लवकरच समोर येतील आणि ज्या रस्त्याने आम्ही जातोय तोच योग्य असल्याची जाणीव शिवसैनिकांना होईल, असा दावाही त्यांनी केला.
मी राष्ट्रवादीमध्ये होतो. त्यानंतर मी राजीनामा दिला. शरद पवार हे मोठे नेते आहेत. मी कधीही त्यांचेवर टीका केली नाही. मात्र त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी मला पवारांपासून दूर ठेवण्याच कसब केलं. तसंच कसब संजय राऊतही दाखवतायत. नारायण राणे यांच्याबरोबर माझा संघर्ष नव्हता. ते ज्या पद्धतीने बोलत होते त्यावर माझा आक्षेप होता. आता ते संपलय असही केसरकर म्हणाले.