मुंबई: महाविकास आघाडीतून (maha vikas aghadi) बाहेर पडण्याची घोषणा करा, तरच आम्ही तुमच्याशी चर्चा करू, अशी अट शिवसेनेच्या बंडखोरांनी शिवसेना (shivsena) नेतृत्वासमोर ठेवली आहे. त्यावर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहोत. आधी तुम्ही मुंबईत या, असं शिवसेनेने म्हटलं आहे. आघाडीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि शिवसेना बंडखोरांमध्ये ठणाठणी सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव मान्य करायचा की नाही हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर आम्ही भाष्य करणार नाही. त्याबाबत शिवसेनेला सल्लाही देणार नाही. पण काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने दिला होता. त्यामुळे विरोधी पक्षात बसण्याची आमची तयारी आहे, असं मोठं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोले यांच्या या विधानावर तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. शिवसेना फुटत असताना काँग्रेसने ही सहकार्याची भूमिका घेतल्याचंही सांगितलं जात आहे.
नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. काँग्रेसचे सर्व आमदार काँग्रेस सोबत आहेत. काँग्रेस आजही महाविकास आघाडी सोबत आहे. सरकारला अजून कोणताही धोका नाही, असं सांगतानाच आज निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीला भाजपच जबाबदार आहे. भाजपचे नेते समोर का येत नाहीत? असा सवाल पटोले यांनी केला.
काँग्रेसने विरोधी पक्षात बसण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यामागे काँग्रेसची चाल आहे की सहकार्याची भावना आहे असा प्रश्न विचारला जात आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे काँग्रेसने सहकार्याची भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास त्याचा फटका पक्षाला बसू शकतो. त्यामुळे तूर्तास मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाणे परवडणार नाही. त्यामुळेही पटोले यांनी विरोधी पक्षात बसण्याची तयारी दर्शवल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोरांना आज नवी ऑफर दिली आहे. आम्ही आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत. पण तुम्ही मुंबईत येऊन चर्चा करा, असं शिवसेनेने म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर शिवसेना अचानक बॅकफूटवर आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने ही ऑफर आमदारांना का दिली नाही? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. तसेच आमदारांना मुंबईत बोलावण्यामागे उद्धव ठाकरे यांची काही खेळी तर नाही ना, असा सवालही केला जात आहे.