शरद पवार यांनी आरक्षण 75 टक्क्यांपर्यंत नेले पाहीजे अशी मागणी केली आहे. परंतू मनमोहन सिंह यांचे सरकार असताना काही मर्यादा वाढविली असा सवाल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. शरद पवार चार वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी आरक्षण मर्यादा का नाही वाढविली असाही सवाल रामदास आठवले यांनी केला आहे.
बीड येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची रॅली झाली. यावेळी भाषण करताना रामदास आठवले यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. भारत हा 140 कोटींचा देश आहे. लोकसभा निवडणूकांच्या वेळी घटना बदलणार अशी चर्चा कॉंग्रेसने सुरु केली. मात्र कोणाचा बाप आला तर संविधान बदलता येणार नाही. आमची कळ काढणे एवढी सोपी गोष्ट नाही. आम्ही दलितांवरील अन्याय आणि बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. मराठे जेव्हा आरक्षण नको म्हणत होते तेव्हा आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्याची पहीली मागणी केली होती असे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले. आज अनेक मराठा नेते पुढाकार घेत आहेत असेही आठवले यावेळी म्हणाले.
केंद्रात नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत. मात्र आम्हाला त्यांनी महाराष्ट्रात बळ दिले पाहीजे. मराठा समाजाच्या पाठीमागे आम्ही आहोत. ओबीसी समाजाला देखील आम्हाला न्याय द्यायचा आहे. जरांगे पाटील यांची मागणी योग्य असली तरी ओबीसींवर देखील अन्याय व्हायला नको. मराठा समाजासाठी विनायक मेटे यांनी चांगले काम केले होते. मराठा समाजासाठी सतत कार्यरत असलेला नेता आज आपल्यात नाही. मला मेटे, गोपीनाथ मुंडे आणि महाजन यांची आठवण यावेळी आल्यावाचून राहत नाही असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले.
गेल्यावेळी 2019 मध्ये पप्पू कागदे यांचे केजमध्ये उमेदवारी साठी नाव पुढे आले. मात्र अचानक दुसऱ्याचे नाव पुढे झाले. यंदा केज मतदार संघाची जागा पप्पू कागदे यांना मिळावी अशी आमची मागणी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. राज्यात आम्हाला दहा जागा मिळाव्यात अशी आमची मागणी असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.