मुंबई : 2014 ला राज्यात भाजपला पाठिंबा देणं ही बिलकूल चूक नव्हती, त्रिशंकू परिस्थिती टाळण्यासाठी आम्ही तटस्थ भूमिका घेतली, असं मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (BJP Ajit Pawar) यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, भाजपला पाठिंबा देणं ही सर्वात मोठी चूक होती, असं यापूर्वी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी म्हटलं होतं. पण राजकीय अस्थैर्य टाळण्यासाठी आम्ही विश्वासदर्शक ठरावात तटस्थ भूमिका घेतली, असं स्पष्टीकरण अजित पवार (BJP Ajit Pawar) यांनी दिलं.
टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुम स्ट्राईक या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी राजीनामानाट्य ते राजकीय घडामोडींपर्यंत दिलखुलास उत्तरं दिली. राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यापासून ते नंतर पत्रकार परिषद घेईपर्यंत काय झालं याचा किस्सा अजित दादांनी सांगितला. अजित पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील मैत्रीबद्दलही विचारण्यात आलं.
“भाजपला पाठिंबा देणं चूक नव्हती”
“भाजपला पाठिंबा दिला ही अजिबात चूक नव्हती. पाठिंबा दिला नसता तर पुन्हा निवडणुका झाल्या असत्या. त्रिशंकू परिस्थिती झाली होती. ही परिस्थिती टाळण्यापुरतंच मत व्यक्त करण्यात आलं. विश्वासदर्शक ठरावाला मी आतमध्ये होतो. आम्ही विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा दिला नाही, आम्ही बसून होतो. आम्ही पाठिंबा दिला नाही तरी तो पास होणार होता, कारण त्यांना सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून निवडून दिलं होतं. गोव्यात जे झालं तसं आम्ही आमदारांची फोडाफोडी केली नाही. पुन्हा लगेच निवडणुकीला जाणं कुणालाच परवडणारं नव्हतं. त्यातही शिवसेनेने पुढाकार घेतला असता, काँग्रेसने पाठिंबा दिला असता आणि राष्ट्रवादीचीही सहमती असती तर आम्ही बहुमत गाठलं असतं,” असंही अजित पवार म्हणाले.
“विश्वासार्हतेवर काहीही परिणाम नाही”
भाजपला पाठिंबा देऊन राष्ट्रवादीने विश्वासार्हता गमावली आहे का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “आम्हाला नाही वाटत, जनतेला काय वाटतं ते जनतेने ठरवावं, आम्ही आमचं काम करतोय, तुम्ही ते कोणत्या नजरेने पाहता त्यावर विश्वासार्हता ठरेल. विरोधी पक्षाची भूमिका आम्ही सातत्याने मांडली. नंतर लोकांसमोरही आम्ही गेलो.”
राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचं भिन्न मत
भाजपला पाठिंबा देणं ही राष्ट्रवादीची घोडचूक असल्याचं मत राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 19 नोव्हेंबर 2014 रोजी व्यक्त केलं होतं. पराभवानंतर राष्ट्रवादीच्या अलिबागमध्ये झालेल्या चिंतन शिबिरात ते बोलत होते. या शिबिरातील अंतर्गत बैठकीत जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
कायम भक्कमपणे राष्ट्रवादीची भूमिका मांडणारे जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला पाठिंबा देणं ही ऐतिहासिक चूक असल्याचं नुकतंच म्हटलं होतं. 21 सप्टेंबर 2019 रोजी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील भाजप सरकारला पाठिंबा देणं ही आमची ऐतिहासिक चूक होती. भाजपला पाठिंबा देण्यापूर्वी अलिबागमध्ये झालेल्या बैठकीत पक्षाचे 35-40 नेते उपस्थित होते. तेव्हा मी शरद पवार यांच्या शेजारी बसलो असूनही या निर्णयाला विरोध केला होता. जर ‘आपण विचारधारेशी तडजोड केली तर संपून जाऊ’ असं शरद पवारांना सांगितलं”, असं आव्हाड म्हणाले.
2014 ला काय झालं होतं?
महाराष्ट्रात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 122 जागांवर विजय मिळाला. बहुमत गाठण्यासाठी भाजपला 23 जागा कमी पडत होत्या. शिवसेनेने सुरूवातीच्या काळामध्ये भाजपला पाठिंबा देण्याऐवजी विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. महिन्याभराच्या कालावधीनंतर शिवसेनेने पाठिंबा देऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.
VIDEO : अजित पवार यांची संपूर्ण मुलाखत