गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा | 2 फेब्रुवारी 2024 : मीही शिवसेनेत होतो. तुम्ही ज्या शिवसेनेत शिकला. त्या इन्स्टिट्यूटचा मी प्रिन्सिपल होतो, असा इशारा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना दिला होता. त्यावर संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमचे प्रिन्सिपॉल फक्त बाळासाहेब ठाकरे होते. आम्हीही शिवसैनिक आहोत, असं प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिलं आहे. त्यामुळे भुजबळ आणि गायकवाड यांच्यातील वाद आगामी काळात रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याची घोषणा भुजबळ यांनी केली आहे. त्यामुळे संजय गायकवाड संतापले होते. त्यांनी भुजबळांच्या कंबरेत लाथ मारून त्यांना हाकलून देण्याची भाषा केली होती. त्यानंतर भुजबळ यांनी तुम्ही ज्या शिवसेनेत शिवसैनिक होता, तेव्हा मी त्या शिवसेनेत प्रिन्सिपल होतो, असा सूचक इशारा गायकवाड यांना दिला होता. त्यावर गायकवाड यांनी थेट भुजबळ यांनाच ललकारले आहे.
जी मला भाषा येते. ती मी वापरली. आपणही ज्येष्ठ आहात. कुण्या समाजाबद्दल भूमिका घेताना जपून घ्यायला पाहिजे. आपले प्रिन्सिपॉल बाळासाहेब ठाकरे होते. आम्ही पण त्यांचेच सैनिक आहोत. म्हणूनच शिवसैनिकांनी भाषा कशी वापरायची हे आम्हाला चांगलं माहीत आहे, असं प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिलं.
57 लाख ओबीसींच्या नोंदी सापडल्या. तुम्ही ओबीसीचे नेते म्हणवता आणि त्याच नोंदींना विरोध करता? आमच्या विरोधात आंदोलने करता? मराठ्यांनाही सवलत आहे. त्यांचे रेकॉर्ड सापडत आहे, तर तुम्हाला जळफळाट का होतोय. का तिरस्कार करताय तुम्ही? कोरोडो लोकांचा तुम्ही तिरस्कार करत आहात. त्या उद्वेगातून ही प्रतिक्रिया आली आहे, असंही ते म्हणाले.