नांदेड : आमच्याकडे ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत आणि काँग्रेसला पैसे कसे उभे करायचे हे माहित आहे. त्यामुळे आम्ही जे 72 हजार रुपयांचं आश्वासन देत आहोत ते पूर्ण करू, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या या योजनेवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
पुन्हा आमचं सरकार आल्यावर हिशेब देऊ आणि जुन्या राज्यकर्त्यांचा हिशेब घेऊ, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हान यांनी पंतप्रधानांना ही भाषा शोभत नसल्याचं म्हणत टीका केली.
प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला उत्तर
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला. अशोक चव्हाणांसहित काँग्रेसचे 30 टक्के उमेदवार सनातनचे समर्थक असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावरही अशोक चव्हाणांनी उत्तर दिलं. आम्हाला सनातन समर्थक म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी हा जावई शोध कुठून लावला, असा प्रश्न काँग्रेस अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. शिवसेना-भाजपवर बोलण्याचं सोडून आंबेडकर आमच्यावर बोलत आहेत, त्यामुळेच लोक आता भाजपची बी टीम कोण असा प्रश्न विचारत असल्याचंही ते म्हणाले.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भाजपला विकून टाकली आहे, जे लोक महापालिकेच्या निवडणुकीत निवडून येऊ शकत नाहीत अशा लोकांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यामुळे लोकसभेचे निकाल येतील स्पष्ट होईल की काँग्रेसचे दुश्मन हे घरातच आहेत, अशी टीका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली होती. यावर अशोक चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारली असता, काँग्रेसची काळजी करू नका, एमआयएमचं पाहा, असा सल्ला इम्तियाज जलील यांना दिला.