मी सर्व साफ करून टाकेन. तुम्हाला ग्रामपंचायतीचा सदस्यही होऊ देणार नाही. माझ्या नादाला लागू नका. तुम्ही आमचे दुश्मन नाहीत. मला तुरुंगात टाकणार आहे. टाका तुरुंगात. इथे बसायचं काय अन् तिथे बसायचं काय? मला तुरुंगात टाकल्यावर भाजपची एकही सीट येणार नाही. नागपूरची सीटही पडेल; असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा इशारा दिला.
मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीत आहेत. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना हाताशी धरून आमच्यावर लाठीचार्ज घडवून आणला होता. गिरीश महाजन यांनी जालन्याताली काही भाजपचे नेते हाताशी धरले होते. देशात असा हल्ला झाला नाही एवढा हल्ला आमच्यावर झाला. एवढं घाण कृत्य फडणवीस यांनी केलं आहे. त्यांनी कुणालाही सोडलं नाही. सगळ्यांवर अन्याय केला आहे. त्यांनी कोणत्याही समाजावर अन्याय करायचं ठेवलं नाही. हा भाजप संपवणार तेव्हाच थांबेल. हा फक्त धमक्याच देत आहे, त्यांना 2024 ला दणका कळेल. थोडं थांबा, असा सूचक इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही भाष्य केलं. मुख्यमंत्री शिंदे यांची शपथ पूर्ण झालेली नाही. सरकारने सगेसोयरे अंमलबाजावणीत आम्हाला फसवलं. आम्ही कोणतीही किंमत मोजू पण आरक्षण ओबीसीतूनच घेऊ, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
ओबीसी नेते एकत्र आले, समाज एकत्र आला नाही. छगन भुजबळ यांनी ही काडी लावली. त्यांना फक्त भांडणं लावता येतात. धनगरांसाठी भुजबळांनी एसटी प्रवर्गातून आरक्षण मागावे, ते प्रचंड जातीयवादी आहेत. त्यांना फडणवीस सांभाळत आहेत. आम्ही ओबीसींच्या विरोधात नाही, तेही आमच्या विरोधात नाही, असंही ते म्हणाले.
जे ड्रोन फिरत आहेत. ते ड्रोन देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. या ड्रोनमळे लोक भयभीत झाले आहेत. तुमच्या ड्रोनमध्ये गोळी असली तरी मी मरत नसतो. मराठे जर चवताळले तर तुमच्या 100 पिढ्यांनी बघितलं नसेल असं आंदोलन होईल, अशा शब्दात त्यानी विरोधकांना बजावलं.