पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उत्तर दिलंय. आमच्या फॅमिलीचं काय घ्यायचंय तुम्हाला, तुमच्या फॅमिलीचं काय असं म्हणत अजित पवारांनी मोदींना टोला लगावला. पंतप्रधानांनी देशाच्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे. महागाई , बेरोजगारी, भ्रष्टाचार यावर बोलण्यापेक्षा पवार फॅमिली बद्दल बोलण्याची काही गरज नव्हती, असंही अजित पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेत पवार कुटुंबावर हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पक्षावरील पकड सुटली आहे. त्यांचा पुतण्या अजित पवारांचं पक्षावर वर्चस्व असल्याचं मोदी म्हणाले होते. पवारांनी माढ्यातून माघार घेतली त्यावरही मोदींना निशाणा साधला. जनतेने निवडणुकीच्या अगोदरच अनेकांना मैदान सोडून पळवलंय, असा टोला त्यांनी लगावला होता.
… तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार : अजित पवार
मावळ गोळीबार प्रकरणावरुन अजित पवारांवर नेहमीच आरोप केला जातो. पण शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याचा आरोप मी दिला होता हे सिद्ध झालं तर राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे, असंही अजित पवारांनी म्हटलंय. मावळमधून अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
मोदी पवार कुटुंबावर नेमकं काय म्हणाले?
“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेलं कौटुंबिक युद्ध ही विरोधकांची सर्वात मोठी समस्या आहे. शरद पवार यांच्या हातातून पक्ष निसटून चालला आहे. पवारांचे पुतणे (अजित पवार) पक्षावर पकड मिळवत आहेत. म्हणून तिकीट वाटपात अडचणी येत आहेत. पवार कुटुंबातील वादांमुळे इतरांमध्ये संभ्रम वाढत आहे.”, असे म्हणत नरेंद्र मोदी यांना पवार कुटुंबावर निशाणा साधला.
“काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी म्हणजे कुंभकर्णासारखी आहे. जेव्हा सत्तेत असतात, तेव्हा 6-6 महिने झोपा काढतात. सहा महिन्यातून एखादा जागा होतो आणि भ्रष्टाचार करून पुन्हा झोपी जातो. पैशांची भूक भागवण्यासाठी जे क्षेत्र मिळेल, तिथे आघाडीतले नेते भ्रष्टाचार करतात.” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.