नवी दिल्ली | 13 डिसेंबर 2023 : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. बुधवारी १३ डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीचे एक मोठे प्रकरण समोर आले. लोकसभेच्या कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीतील दोन व्यक्तींनी सभागृहात प्रवेश केला. रंगीत धूर सोडला. या घटनेमुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. त्या दोन तरुणांना संसदेत प्रवेश कसा मिळाला याची माहिती समोर आली आहे. मात्र, यामुळे संसदेत सामान्य व्यक्तीलाही प्रवेश मिळू शकतो का? कुणाच्या शिफारशीमुळे प्रवेश मिळतो, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात का? असे प्रश्न विचारले जात आहेत. याच प्रश्नांची ही उत्तरे…
संसदेचे कामकाज सामान्य व्यक्तीलाही पाहता येते. संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांमध्ये सामान्य लोकांसाठी व्ह्यूइंग गॅलरी आहेत. या गॅलरीत प्रवेश करण्यासाठी एक वैध कार्ड आवश्यक आहे. ज्याला व्हिजिटर कार्ड म्हणतात.
व्हिजिटर कार्डसाठी सभागृहातील सदस्यांनी विहित फॉर्ममध्ये बैठकीच्या तारखेच्या आधी कामकाजा दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज करावा लागतो. ज्याला प्रवेशपत्र द्यायचे आहे त्या व्यक्तीचे नाव, त्याची संपूर्ण माहिती त्या छापील फॉर्ममध्ये देणे बंधनकारक असते.
खासदार त्यांच्या वैयक्तिक ओळखीच्या कोणासाठीही व्हिजिटर कार्डसाठी अर्ज करू शकतात. काही निवडक प्रकरणांमध्ये ज्यांची ओळख त्यांना वैयक्तिकरित्या ओळखणाऱ्या व्यक्तीने केली आहे ते अभ्यागत कार्डसाठी अर्ज करू शकतात. काही व्यक्ती फार कमी कालावधीसाठी दिल्लीला भेट देतात. यात मित्र, जवळचा नातेवाईक असतील आणि एक दिवस अगोदर अर्ज करणे शक्य नसेल तर सदस्य त्याचदिवशी व्हिजिटर कार्ड देण्यासाठी विशेष विनंती करू शकतात. हे कार्ड मिळाल्यानंतर दोन तासांनी गॅलरीत प्रवेशासाठी वैध ठरतात.
सदस्याने व्हिजिटर कार्ड देण्यासाठी अर्ज केल्यानंतर प्रवेशपत्रे तयार होतात. ही तयार झालेली प्रवेशपत्रे अर्ज करणाऱ्या सदस्यांना दिली जातात. अथवा त्यांच्या निवासस्थानी पाठवली जातात. निवासस्थानी कार्ड पाठवले असल्यास सदस्यांनी मेसेंजर बुकमध्ये कार्ड प्राप्त केल्याचा अहवाल द्यावा लागतो. व्हिजिटर कार्ड देण्यापूर्वी सदस्यांना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते. कारण, अशा कार्डधारकांनी केलेल्या कोणत्याही कृत्यामुळे गॅलरीमध्ये घडणाऱ्या कोणत्याही अनुचित घटना किंवा अनिष्ट गोष्टीसाठी त्या खासदाराला जबाबदार धरले जाते.
संसद भवन संकुलात प्रवेश करताना त्या व्यक्तीला त्याचे ओळखपत्र सुरक्षा कर्तव्यावर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना दाखवावे लागते. संसद भवनातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध गेटवर डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. संसद सदस्य आणि माजी सदस्य यांच्यासोबत आलेले अभ्यागत डोअर फ्रेम मेटल डिटेक्टरमधून जातात. त्यांची प्रत्यक्ष तपासणी केली जाते. त्यांच्याकडील सामान, इत्यादींची कडेकोट तपासणी सुरक्षा कर्मचार्यांकडून केली जाते.
अभ्यागतांच्या गॅलरीमध्ये प्रवेशासाठी दिलेले हे कार्ड फक्त एका बैठकीसाठी वैध असते. व्ह्यूइंग गॅलरीची क्षमता ठराविक लोकांइतकी असते. त्यामुळे फक्त एक तासाच्या कालावधीसाठी असे कार्ड जारी केले जाते. ही कार्डे इतर कोणत्याही व्यक्तीला दिली जाऊ शकत नाहीत. तसेच कार्डधारकाने दिलेल्या अटींचे पालन केले तरच ते जारी केले जाते.