मुंबई : (Shivsena) शिवसेना आणि (Eknath Shinde) शिंदे गट हे एक व्हावेत अशी भूमिका दिपाली सय्यद यांनी घेतली असली तरी याबाबत काय प्रयत्न आहेत हे अद्यापही समोर आलेले नाही. याबाबत संभ्रम कायम असतानाच एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दोन दिवसांमध्ये चर्चा होऊ शकते असे ट्विट दिपाली सय्यद यांनी केले होते. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट हे एकत्र येण्याबाबत (Deepali Sayyad) दिपाली सय्यद ह्या नेमक लुडबूड करीत आहेत की खरोखरच समेट घडवून आणत आहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही नेत्यांच्या चर्चेबाबत कुठेच काही नसताना दिपाली सय्यद यांनी केलेले वक्तव्य हे बुचकळ्यात टाकणारे आहे. शिवसेनेत दोन गट नकोत पण त्यासाठी कोणते उपाय हे स्पष्ट न केल्याने त्यांनी घेतलेली मध्यस्तीची भूमिका कितपत यशस्वी ठरणार हे पहावे लागणार आहे.
शिवसेनेतील आमदारांच्या भूमिकेनंतर दोन गट पडले आहेत. मात्र, एकाच कुटुंबाची असे गट ही बघवणारी स्थिती आहे. एकाच आधारवडाखाली शिवसेनेचे कार्यकर्ते असणे महत्वाचे आहे. त्यामुळे आता अधिकचा वेळ न जाता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी यावे असे माझे मत असल्याचे दिपाली सय्यद यांनी सांगिते तर ही काय माझ्या एकटीचीच इच्छा नाहीतर असंख्य शिवसैनिकांच्या मनातले आपण बोलून दाखवले असल्याचेही त्या म्हणाल्या.
शिवसेनेतील दोन गटामुळे शेवटी नुकसानच होणार आहे. भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी या दोन्ही गटांनी एकत्र यावे आणि त्यासाठीच आपण मध्यस्तीची भूमिका घेत आहे. अगदी सुरवातीपासून यावर माझे लक्ष राहिले आहे. शिवाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. ते निर्णय घेण्यासही सक्षम आहेत. पण आपल्याला जे मनातून वाटते त्याबाबत व्यक्त होत असल्याचे म्हणत त्यांच्यात खरोखरच चर्चा होणार का प्रश्न अनुत्तरीतच राहीलेला आहे.
दिपाली सय्यद यांनी आपली भूमिका मांडताना शिंदे गट आणि शिवसेनेतील नेत्यांच्या मनात काय आहे हे देखील सांगितले. तर दुसरीकडे खा. संजय राऊत यांनी त्या एक अभिनेत्री आहेत. याबद्दल त्यांना बोलण्याचा अधिकार कोणी दिला असाच सवाल उपस्थित केला आहे.त्यामुळे दिपाली सय्यद ह्या नेमकी कुणाच्या मनातील भावना बोलून दाखवत असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या ट्विटने आणि घेतलेल्या भूमिकेमुळे वास्तव चित्र वेगळे आणि त्यांची भावना वेगळी याचाच प्रत्यय येत आहे.
शिवसेना आणि शिंदे गटातील आमदारांचीही इच्छा आहे की पुन्हा एकत्र यावे असेही दीपाली सय्यद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, याबाबत पुढाकार कोण घेणार? असा सवाल उपस्थित करताच त्यांना सांगता आले नाही. तर कुटुंब प्रमुख म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सदैव मातोश्री चे दरवाजे उघडे असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे दीपक केसरकर हे देखील एकत्र येण्याबाबत सातत्याने पुढाकार घेत असल्याचे जाणवते. पण पुढाकार कोणी घ्यावा याबाबत दीपाली सय्यद ठोस भूमिका मांडू शकल्या नाहीत.
केवळ संवादामुळे ठाकरे आणि शिंदे गट हा एकत्र होऊ शकलेला नाही. त्यामुळे हे अंतर अधिक न वाढता दोन्ही गटाकडूनही मान-अपमान बाजूला सारुन एकत्र येणे गरजेचे आहे. याबाबत दीपाली सय्यद ह्या नेमका सल्ला शिंदे गटातील आमदारांना देतात की शिवसेनेतील आमदरांना हे देखील स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे दिपाली सय्यद नेमकं काय करतायत? लुडबूड की समेट? हा प्रश्न उपस्थित होत आहे.