धनंजय मुंडे प्रकरणात गेल्या 51 तासात काय घडले?, वाचा 14 मोठ्या घडामोडी…

| Updated on: Jan 14, 2021 | 8:36 PM

धनंजय मुंडे प्रकरणात महाविकास आघाडीच्या घटकपक्षातील नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया, भाजपचा थेट हल्ला, शरद पवारांचं मुंडेंवर भाष्य ते थेट इशारा, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका, अशा मॅरेथॉन घडामोडी घडल्या. 

धनंजय मुंडे प्रकरणात गेल्या 51 तासात काय घडले?, वाचा 14 मोठ्या घडामोडी...
Follow us on

मुंबई :  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि धनंजय मुंडे यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधाची दिलेली कबुली, यावरुन आता राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे.  त्यानंतर विविध राजकीय घडामोडींनी गेले दोन ते तीन दिवस गाजले. यादरम्यान महाविकास आघाडीच्या घटकपक्षातील नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया, भाजपचा थेट हल्ला, शरद पवारांचं मुंडेंवर भाष्य ते थेट इशारा, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका, अशा मॅरेथॉन घडामोडी घडल्या.  (What happened in the last 51 hours in Dhananjay Munde case ?, Read 14 big developments)

रेणू शर्मा यांचा धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप

रेणू शर्मा नावाच्या एका तरुण गायिकेनं ओशिवरा पोलिस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. रुणीने केलेल्या आरोपांनुसार 2006 पासून अत्याचार सुरु असल्याचा दावा तिने केला आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका फेसबुकवरुन मांडली आहे.

धनंजय मुंडेंकडून विवाहबाह्य संबंधांची कबुली

करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे, अशी कबुली धनंजय मुंडे यांनी दिली.

फडणवीसांची मवाळ तर चंद्रकांतदादांची जहाल भूमिका

धनंजय मुंडे यांच्यावरती बोलताना भाजपच्या नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला. तर त्यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा त्यांनी दिला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांच्या प्रकरणी सावध प्रतिक्रिया दिली. “धनंजय मुंडे यांनी कबुली दिली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. चौकशी झाल्यावरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु”, असं म्हणत फडणवीसांनी आश्चर्यकारक भूमिका घेतली.

धनंजय मुंडे शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओकवर (बुधवार)

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करुन आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर प्रचंड गदारोळ माजला. विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी बुधवारी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यासमोर आपली बाजू सविस्तरपणे मांडली.

धनंजय मुंडेंनी अजितदादा, भुजबळांचीही घेतली भेट (बुधवार)

तत्पूर्वी बुधवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्या भेटीलाही गेले होते. त्यामुळे आता नेमके काय घडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

प्यार किया तो डरना क्या?, शिवसेना नेते राज्यमंत्री अब्दुल सत्तार मुंडेंच्या पाठीशी

‘प्यार किया तो डरना क्या’, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय. “धनंजय मुंडे यांनी त्यांचे संबंध लपवून ठेवलेले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सर्व खुलासा केला आहे. त्यांनी त्यांची बाजू महाराष्ट्रासमोर मांडली आहे. तसंच दोघांच्या संमतीने असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तर मग प्यार किया तो डरना क्या?”, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना वापरलेल्या वाक्याची आठवण करुन दिली.

धनंजय मुंडे भल्या पहाटे एकटेच चित्रकूट बंगल्यावर (गुरुवार)

गुरुवारी पहाटे मुंबईच्या मलबार हिल येथील चित्रकूट बंगल्यावर येताना धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना खबर लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. पहाटे अडीच-तीनच्या सुमारास धनंजय मुंडे एका खासगी गाडीतून चित्रकूट बंगल्यावर आले. या गाडीच्या काचा काळ्या असल्यामुळे आत नेमके कोण बसले आहे, याचा अंदाज पटकन येणे शक्य नव्हते. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासोबत नेहमीप्रमाणे पोलीस आणि सुरक्षारक्षकांचा ताफा नव्हता. ते एकटेच चित्रकूट बंगल्यावर आले होते.

संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

“हा पूर्णपणे धनंजय मुंडे यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. हे आपण मुंडे यांच्यावर सोडलं पाहिजे, ते त्यातून मार्ग काढतील. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सुजाण आणि प्रगल्भ आहे. काय निर्णय़ घ्यावेत आणि काय नाही याचा सर्वात जास्त अनुभव कुणाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना आहे”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

…लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

“राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकतीय स्तरावर यायला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही. धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च न्यायालयातही यापूर्वीच अर्ज दाखल केलेला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. कुटुंबातील अंतर्गत बाब आहे. धनंजय मुंडे यांनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलीय.

मुंडेंवर गंभीर आरोप, पक्ष म्हणून दखल घेतलीय-  शरद पवार

“ धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून आम्ही चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ. त्याचवेळी कोणावरही अन्याय होणार नाही हे सुद्धा पाहू” असं शरद पवार म्हणाले. यावेळी शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे असंही विचारण्यात आलं. त्यावेळी शरद पवारांनी रोखठोक भाष्य केलं. मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू. आम्हाला आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढची भूमिका काय असावी, याचा विचाराने निर्णय होईल, असं शरद पवार म्हणाले.

गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी कार्यालय गाठून जनता दरबार

बलात्कारासारखे गंभीर आरोप झाल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी आपला दैनंदिन क्रम तसाच ठेवला आहे. आरोपांनंतरही ते वेगवेगळ्या बैठकांना हजेरी लावत आहेत. आज (14 जानेवारी) त्यांनी जनता दरबारही घेतला आणि विविध नागरिकांचे प्रश्न जाणून घेत त्यावर उपाययोजना केल्या. मात्र यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे जाणवत होता.

रिलेशनशिपसाठी रेणू शर्माचा माझ्यावरही दबाव, भाजप नेते कृष्णा हेगडेंचं पोलिसांना पत्र 

भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी याबाबत मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.

मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे.

मनसेच्या मनीष धुरींनाही रेणू शर्माचे कॉल

“मनसे कार्यकर्ते मनीष धुरी यांच्याशी देखील रेणू शर्मा असं वागली आहे. धुरी यांचा मला फोन आला होता, ते सुद्धा हेच सांगत होते,” असे भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी सांगितले. “मी कोणत्या महिलेवर उगाचच आरोप कशाला करु? धनंजय मुंडे, मनीष धुरी यांच्याबाबतही असं झालं आहे. हे हनी ट्रॅपचं जाळं आहे. आपल्या जाळ्यात पकडून लुटायचं. आज धनंजय मुंडेंच्या बाबतीत झालं आहे. उद्या माझ्याबाबतही झालं असतं, असे कृष्णा हेगडेंनी सांगितले.

रेणू शर्मांचं आणखी एक वादग्रस्त प्रकरण

रेणू शर्मांनी जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी नावाच्या तरुणाला छळल्याचा आरोप झाला आहे. पोलिसांकडे असलेल्या कागदपत्रांपैकी काही कागदपत्रे माध्यमांच्या हाती लागली आहेत. यावरुन रेणू शर्मा यांनी कुरेशी यांच्यासोबत सोशल मिडीयावरून ओळख झाल्यानंतर मैत्री केली. त्यानंतर भेटीगाठी, हॉटेलिंग आणि असं बरेच काही घडलं हे जवळपास 2 वर्ष चालले त्यानंतर मात्र या महिलेने रिझवान कुरेशी विरोधात याच आंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केल्याचं यातून समोर येतंय.

हे ही वाचा

…तर दहा वर्षापूर्वीच माझाही धनंजय मुंडे झाला असता, मनसेच्या मनीष धुरींचाही रेणू शर्मावर गंभीर आरोप

मनसेच्या मनीष धुरींनाही रेणू शर्माचे कॉल, कृष्णा हेगडेंनी वात पेटवली

संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार नसतो, मनसेच्या रुपाली पाटील यांचं रोखठोक वक्तव्य

(What happened in the last 51 hours in Dhananjay Munde case ?, Read 14 big developments)