नवी दिल्ली : सातव्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर तुम्हाला टीव्ही आणि वृत्तपत्रात एक्झिट पोल पाहायला मिळेल. एक्झिट पोलचे आकडे अनेकदा अचूक ठरतात, तर काही वेळा हा अंदाज खराही ठरतो. एक्झिट पोलची प्रक्रिया अत्यंत कठीण असते. एक्झिट पोल नेहमी मतदानाच्या अखेरच्या दिवशीच जारी केला जातो. मतदानाच्या दिवशीही माहिती जमा केली जाते. मतदार मतदान केंद्राच्या बाहेर जेव्हा येतो, तेव्हा त्याने मतदान कुणाला केलं हे विचारलं जातं. या आधारावर आकडेवारीचं विश्लेषण केलं जातं. सर्वसाधारणपणे टीव्हीवर मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल दाखवला जातो.
पोस्ट पोल म्हणजे काय?
पोस्ट पोल नेहमी एक्झिट पोलपेक्षा तंतोतंत मानले जातात. कारण, एक्झिट पोलमध्ये एजन्सीकडून मतदानानंतर तातडीने मतदाराकडून माहिती घेतली जाते, तर पोस्ट पोलमध्ये नेहमी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी किंवा एक ते दोन दिवसांनंतर मतदान कुणाला दिलं हे जाणून घेतलं जातं. उदाहरणार्थ, सहाव्या टप्प्याचं मतदान 12 मे रोजी झालं आहे. तर सर्वे करणाऱ्या एजन्सीकडून मतदाराला 13, 14 किंवा 15 मे रोजी विचारणा केली जाते. यालाच पोस्ट पोल म्हणतात.
पोस्ट पोल जास्त तंतोतंत का असतात?
एक्झिट पोलमध्ये मतदान दिल्यानंतर लगेचच मतदाराला विचारणा केली जाते. मतदार अनेकदा गोंधळलेल्या अवस्थेत स्वतःची ओळख लपवत चुकीचंही उत्तर देतात. पण पोस्ट पोलमध्ये मतदानानंतर मतदारांनी कुणाला मत दिलं ते जाणून घेतलं जातं. यावेळी मतदार कोणत्याही गोंधळात नसतो, ज्यामुळे योग्य उत्तर मिळतं.
ओपिनियन पोल म्हणजे काय?
ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल यांच्यात अंतर आहे. ओपिनियन पोलचा सर्वात जास्त वापर पत्रकार आणि निवडणूक सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीजकडून केला जातो. या माध्यमातून पत्रकार विविध मुद्द्यांना हात घालतात आणि त्यावर चर्चा घडून येते. जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन यांनी ओपिनियन पोलचा सर्वात पहिल्यांदा वापर केला होता.
मतदारांचं मत कसं जाणून घेतलं जातं?
ओपिनियन पोलमध्ये सर्व्हे करणाऱ्या एजन्सीचे प्रतिनिधी थेट जनतेशी संवाद साधून आकड्यांची जमवाजमव करतात. यामध्ये उमेदवार आणि पक्षाबाबत प्रश्न विचारले जातात. या प्रक्रियेमध्ये लोकांकडून एक फॉर्म भरुन घेतला जातो, ज्यामध्ये त्यांची ओळख गुप्त ठेवली जाते, जेणेकरुन आपल्या उमेदवाराविषयी त्यांनी दिलखुलासपणे बोलता येईल. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सॅम्पलिंग असतो.
सॅम्पलिंग कशी केली जाते?
ओपिनियन पोलमध्ये केवळ काही लोकांच्या मतांवर आधारित निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही. विविध राज्य, विधानसभा आणि क्षेत्रांची विशेष पद्धतीने प्रक्रिया केली जाते. उदाहरणार्थ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सॅम्पलिंगचा आधार वेगवेगळा असेल. कारण, ज्या व्यक्तीला प्रश्न विचारण्यात आलाय, त्याचा जात-धर्म आणि सामाजिक पार्श्वभूमी यांचीही काळजी घेतली जाते. सामाजिक पार्श्वभूमी, जात, धर्म या गोष्टी लक्षात ठेवून सर्व्हे केल्यास पाच हजार सॅम्पलमध्येही तंतोतंत निष्कर्ष काढला जाऊ शकतो.
रँडम सॅम्पलिंगचाही आधार
देशातील मोठ्या एजन्सी रँडम सॅम्पलिंगचाही आधार घेतात. यामध्ये मतदारसंघ, बूथ स्तरावर आणि मतदारांच्या स्तरावर रँडम सॅम्पलिंग केली जाते. समजा, एखाद्या बूथवर दोन हजार मतदार आहेत आणि त्यापैकी 100 जणांचं मत जाणून घ्यायचं असेल. यासाठी दोन हजारला 100 ने भाग दिल्यास 20 उरेल. यानंतर मतदार यादीत असा कोणताही नंबर जो 20 पेक्षा कमी असेल, तो रँडम पद्धतीने घेतला जाईल. उदाहरणार्थ, 12 क्रमांक घेतला. मतदार यादीत बाराव्या क्रमांकावर जो मतदार असेल, तर पहिला सॅम्पलिंग उमेदवार असेल आणि त्याची मुलाखत घेतली जाईल.