औरंगाबाद : काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले घेऊन घेऊन नाव काय घेतात.. संघर्ष यात्रा… सांगा बरं संघर्ष यात्रा कोणी केली? असा सवाल करत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा साधलाय. संघर्ष यात्रेमुळे हे लोक सत्तेबाहेर पडले, ते परत मोठ्या मानाच्या खुर्चीवर कधी बसू शकले नाहीत हे शल्य त्यांच्या मनात असल्याचं पंकजा मुडेंनी म्हटलंय. मुंडे साहेबांनी संघर्ष यात्रा सुरू केली आणि सत्ता परिवर्तन झालं. आता हे संघर्ष यात्रा म्हणतात.. सांगा हा संघर्ष कोणाचा आहे? असा सवाल उपस्थित करत पंकजांनी विविध मुद्द्यावरुन विरोधकांवर टीका केली.
यांना जेवायला पोळी भाकरी आणि पाणी लागत नाही, तर यांना खायला पैसाच लागतो. तोंड बांधल्यामुळे यांच्यात संघर्ष होतोय. या संघर्षासाठी यात्रा करत असल्याचा आरोप पंकजा यांनी केला. परिवर्तन यात्रेवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, कसली परिवर्तन यात्रा… तुमच्याकडे 70 वर्ष सरकार असताना परिवर्तन करायला सुचलं नाही.. दोन खोलीच्या घरातून तुम्ही दोन एकराच्या बंगल्यात गेलात हे परिवर्तन स्वतःचं केलं.. पण आमच्या गरीब जनतेचं परिवर्तन केलं नाही.. आता म्हणतात परिवर्तन यात्रा परिवर्तन होणार उरले सुरलेले आता घरी बसणार आहेत.”
भाजपची विभागीय क्लस्टर बैठक औरंगाबादेत पार पडली. बीड, जालना, परभणी, औरंगाबाद या चार जिल्ह्यांची ही विभागीय बैठक होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुडे, राज्यमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, खासदार प्रीतम मुडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. सुमारे चार हजार बूथ केंद्र प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख यांची बैठकीला उपस्थिती होती. ‘फिर से एक बार मोदी सरकार’चा नारा देत पंकजा मुंडे यांनी भाजपने केलेल्या कामांचा पाढा वाचला. तुमच्याकडे (काँग्रेस-राष्ट्रवादी) 70 वर्षे सत्ता असताना तुम्हाला परिवर्तन करता आलं नाही. त्यामुळे 2014 पेक्षा जास्त लाट यंदा राहणार असल्याचं पंकजा यांनी ठणकावलं. या बैठकीला मराठवाड्यातले सर्व मंत्री आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 2014 मध्ये ज्या पद्धतीने विजय मिळवला तसाच आता 2019 मध्ये मिळवणार असून महाराष्ट्रात प्रचाराची जबाबदारी ही माझ्याकडेच असणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
भाजपला पाच वर्षे सत्ता मिळाली, तर पुढचे 50 वर्ष आपल्याला सत्ता मिळणार नाही ही भीती विरोधकांना वाटत असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर टीका केली. आघाडीचे लोक पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण सांगू शकत नसल्याची खिल्लीही दानवेंनी उडवली. याचबरोबर 2014 प्रमाणेच यंदाही देशाचे पंतप्रधान मोदींनाच करायचं असल्याचं दानवे यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना म्हंटलं. त्यामुळे देशाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची असून खरी लढाई ही भाजप आणि काँग्रेसमध्येच असल्याचं दानवेंनी म्हंटलंय.
व्हिडीओ पाहा :