महायुतीविरोधात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा अजेंडा काय? विजय वडेट्टीवार म्हणाले…

| Updated on: Jul 25, 2024 | 9:58 PM

आगामी विधानसभा निवडणुका या वैचारिक दृष्टीने लढल्या जातात. निवडणुकीसाठी राज्यातील मूलभूत प्रश्न आहेत. लोकसभा निवडणूक आम्ही संविधानासाठी लढलो. आता आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणार आहोत.

महायुतीविरोधात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा अजेंडा काय? विजय वडेट्टीवार म्हणाले...
vijay vadettivar
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

पावसाळा पूर्वी सुद्धा येत होता. मात्र, अशी परिस्थिती येत नव्हती. ड्रेनेज सिस्टीम अपडेट करण्याची गरज आहे. लोकसंख्या वाढते आहे. शहरीकरण वाढते आहे. सगळा ताण पडत आहे. सिमेंटचे रोड झाले त्यात ड्रेनेज सिस्टीम नाही. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आणि नुकसान होत आहे. अशीच काही परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. राज्यामध्ये 25 जणांचे पुराच्या पाण्यात जीव गेले आहे. 500 च्या वर जनावरे वाहून गेली आहेत. इतके भयानक रूप या पुराचे आहे. त्यामुळे सरकारने नुकसान भरपाई म्हणून, खावटी म्हणून पाच हजार रुपये पूरग्रस्तांना दिले पाहिजे. पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज घोषित करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना जो काही संदेश दिला ते देण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. कोणालाही आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु, महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना यश येणार नाही. त्यांनी लढले पाहिजे. प्रत्येक पक्षाला निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखविण्याची संधी असते. त्यांची शक्तीसुद्धा महाराष्ट्रातील जनतेला कळेल, असा टोला त्यांनी लगावला.

प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही. ओबीसी आंदोलनावर त्यांनी अनेक वेळा टीका केली आहे. त्यांना जे वाटते ते त्यांनी करावे. ओबीसीचे आरक्षण टिकावे ही आमची भूमिका आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. सरकारला काय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी घेतला पाहिजे. त्यांच्याकडे बहुमत आहे मग ते निर्णय का घेत नाहीत. विरोधकांवर बोलतात की बैठकांना येत नाही. पण त्याचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. जरांगे पाटलांचे किंवा ओबीसीचे उपोषण आहे. ते सरकारने स्थगित केले. आता गळ्यात हड्डी अडकली म्हणून बोंबाबोंब सुरू आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली.

आगामी विधानसभा निवडणुका या वैचारिक दृष्टीने लढल्या जातात. निवडणुकीसाठी राज्यातील मूलभूत प्रश्न आहेत. लोकसभा निवडणूक आम्ही संविधानासाठी लढलो. आता आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणार आहोत. महाराष्ट्राला गुजरातकडे गहाण ठेवण्याचे काम चालले आहे. हा कलंकाचा डाग पुसायचा आहे. महाराष्ट्रातला शेतकरी, बेरोजगार, महिलांवरील अत्याचार हे सगळे विषय घेऊन आम्ही निवडणुक लढविणार आहे. जनतेला दिलासा आणि न्याय देण्याचे काम आम्हीच करणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.