मुंबई : परस्परांना नावे ठेवण्यातच ज्यांनी चार वर्षे घालवली, त्या भाजप-शिवसेनेमध्ये आता नाममहात्म्याचे आख्यान रंगण्याची चिन्हे आहेत. राज्यात विरोधी पक्षाचे नाव मतदारांना आठवता कामा नये अशी तगडी तजवीज करत शिवसेनेने भाजपला वेळोवेळी घाम फोडलाय. युती पक्षातील ही कुरघोडी साक्षात पंतप्रधानांच्या वडिलांच्या नावाची हेतूपुरस्सर आठवण करून देण्यापर्यंत पोहोचली होती. देशात नामांतराची लाट आली असताना युतीपक्षांमध्येही नामकरणाचा तिढा उद्भवला आहे.
सरकारी प्रकल्प, मार्ग, पूल वा एखादी संस्था उभी झाल्यानंतर त्यास स्वपक्षीय नेत्यांची नावे देत त्यांना अजरामर करण्याची राज्यकर्त्यांची धडपड सातत्याने असते. एका रात्रीत नाव देऊन फलक लावण्याचे प्रसंग महाराष्ट्राने यापूर्वी अनुभवले आहेत.
मुंबईच्या वरळी सी-लिंकच्या नामकरणावेळी तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत एकोपा दिसला होता. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या ‘नागपूर-मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस-वे’ अर्थात समृद्धी महामार्गाच्या भूमीपूजनापूर्वीच या मार्गाला कुणाचं नाव द्यायचं त्यावरुन वाद समोर आलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या या महामार्गाला सुरुवातीला शिवसेनेने विरोध केला. नंतर सकारात्मकता दाखवली. हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे आणि या खात्याचे मंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी खुद्द या महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची विनंती सरकारकडे केली होती.
भाजपकडून दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव समोर केल्याने खरा राजकीय पेच निर्माण झालाय. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा संपूर्ण महाराष्ट्राला जोडणारा आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्राला जोडण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्राला एकत्र जोडून ठेवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यामुळे या महामार्गाला त्यांचं नाव देण्यात यावं, असं शिवसेना आमदार सुनील प्रभू म्हणाले.
माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यास कडाडून विरोध केलाय. समृद्धी महामार्ग हे नाव वाईट आहे काय? असा सवाल श्रीहरी अणे यांनी केलाय. शिवसेनेच्या एकाही नेत्याने विदर्भासाठी काहीही केलेलं नाही. या एका कारणासाठी तरी शिवसेनेच्या नेत्याचं नाव समृद्धी महामार्गाला नको, असं श्रीहरी अणेंचं म्हणणंय.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यांना उद्वस्त करणारा महामार्ग म्हणून याची ओळख झालीय आणि या महामार्गाच्या विरोधात आंदोलनाची पहिली ठिणगी ही ठाणे जिल्याच्या शहापूर तालुक्यात पडली होती. त्यानुसार शहापूर तालुक्यातील स्व. स्वातंत्र्य सैनिक किसानबाबा भेरे यांची जन्मभूनी असलेलं धासई, कासगाव, शेळवली या भागतून ‘समृद्धी’ विरोधात शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. त्यानुसार समृद्धी महामार्गाला महाराष्ट्रात पहिला विरोध हा शहापूर तालुक्यातून करण्यात आला होता.
त्यामुळे आंदोलनाची पहिली ठिणगी ही शहापूर तालुक्यातून पडली आणि जागा भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावलं होतं. त्याचे परिणाम बघता-बघता समृद्धीच्या विरोधात महाराष्ट्र सगळीकडे आंदोलनं झाली. मात्र आता आंदोलनं शमली आहेत. सरकारने पाच पटीने मोबदला देऊन जमिनी खरेदी केल्यात. आता विरोधात असणारे याच तालुतील शेतकरी स्व. स्वातंत्र्य सैनिक किसानबाबा भेरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला द्यावे अशी मागणी करत आहेत.
यापूर्वीच्या युती सरकारच्या काळात अनेक उड्डाणपपूल साकारणाऱ्या नितीन गडकरींमागे शिवसेनाप्रमुख भक्कमपणे उभे राहिले होते. गडकरीच्या विदर्भातून मात्र विदर्भाला विरोध करणाऱ्या शिवसेनेला लक्ष्य करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्यासमोरील दुष्काळाचे तसेच पेयजलाच्या टंचाईचे सावट असताना समृद्धीच्या नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. भरीस भर राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनही सुरू झालंय. नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या रस्त्यावरून वादाचे मुद्दे अधिकाधिक ‘समृद्ध’ करण्याची खेळी खेळली जाईल, असं आता एकंदरीत चित्र दिसतंय.
दोन्ही पक्षांतील दिग्गजांच्या नावाने लढला जाणारा नाम-तिढा दुर्लक्षिण्याजोगाही नाही. युतीच्या महामार्गातील धक्के निवडणुकीपर्यंत संपू न देण्याची काळजी पद्धतशीर घेतली जातीय हे मात्र आता सगळ्यांना कळून चुकलंय. त्यामुळे मुंबई आणि मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला कोणत्या पक्षाने सुचवलेलं नाव लागणार, हे पाहणं हा ही एक औत्सुक्याचा विषय म्हटल्यास वावगं ठरणार नाही.