लखनौ : भाजपच्या उमेदवार अभिनेत्री जया प्रदा यांनी बुधवारी उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी प्रचार सभेला हजेरी लावली. या प्रचार सभेत बोलत असताना त्या भावूक झाल्या. सभेत कार्यकर्त्यांना संबोधत असताना त्यांचे डोळे पाणावले, त्यानंतर त्यांनी थोडावेळ थांबून पुन्हा भाषणाला सुरुवात केली.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जया प्रदा यांची प्रचार सभा होती. “मी भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी आली आहे”, असे त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या वक्तव्यांचा निषेधही केला. “आझम खान यांना पूर्वी माहित नव्हते का, की मी सिनेमांतून आली आहे, मी नाचणारी आहे”, अशा शब्दांत त्यांनी रोष व्यक्त केला.
भाषण करत असताना त्या अत्यंत भावूक झाल्या. मला रामपूर कधीही सोडायचे नव्हते, मला तर रामपूरच्या जनतेची सेवा करायची होती, असेही त्या म्हणाल्या. रामपूरमध्ये माझ्यावर हल्ला करण्यात आला, त्यामुळे मी राजकारणापासून दूर झाली, हे बोलत असताना त्यांचे डोळे पाणावले आणि त्या मंचावरच रडू लागल्या.
जया प्रदा यांना रडताना बघून कार्यकर्त्यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘जयाजी आम्ही तुमच्या सोबत आहोत’, अशा घोषणा केल्या. त्यानंतर जया प्रदा यांनी पुन्हा त्यांच्या भाषणाला सुरुवात केली.