कोलकाता | 10 मार्च 2024 : पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणुकासाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर, इंडिया आघाडीसोबत असलेल्या तृणमूल कॉंग्रेसने आघाडीतून बाहेर पडत पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केलीय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी ही यादी जाहीर केली. मात्र ही यादी जाहीर होताच राज्यात एका वेगळ्याच चर्चेने जोर धरला आहे. तृणमूल काँग्रेसने बांकुरा जिल्ह्यातील बिष्णुपूर मतदारसंघातून सुजाता मंडल यांना तिकीट दिले आहे. तर, भाजपने त्यांचे माजी पती सौमित्र खान यांना उमेदवारी दिली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालच्या बिष्णुपूर मतदारसंघातून सौमित्र खान यांनी निवडणूक लढविली. त्यावेळी सौमित्र खान यांनी तृणमूल कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सौमित्र यांची गणना बिष्णुपूरच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये केली जाते. त्या निवडणुकीत सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल यांनी त्यांचा प्रचार केला होता. मात्र, ही जागा तृणमूलने जिंकली होती.
पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. याचदरम्यान सौमित्र खान आणि सुजाता मंडल यांनी घटस्फोट घेतला. सुजाता मंडल यांनी या दरम्यान टीएमसी सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला. बिष्णुपूर मतदारसंघातून पुन्हा एकदा सौमित्र खान यांना संधी देण्यात आली आहे. त्याची घोषणा महिन्याच्या सुरुवातीलाच करण्यात आली होती.. मात्र, तृणमूलने याच जागेवरून सुजाता मंडल यांच्या नावाची घोषणा करून खान यांना धक्का दिला.
TMC उमेदवारांच्या यादीत 12 महिलांची नावे
पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी TMC ने राज्यातील सर्व 42 लोकसभा जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात पक्षाने विद्यमान 7 खासदारांना तिकीट नाकारले आहे. त्याच्याऐवजी माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्यासह काही नवीन चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने 23 पैकी 16 खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
तृणमूलने दोन वर्षांपूर्वी भाजप सोडून पक्षात सामील झालेले बराकपूरचे खासदार अर्जुन सिंह यांना तिकीट नाकारले आहे. TMC च्या या उमेदवार यादीत 12 महिला आहेत. तर, 26 नवीन उमेदवारांपैकी 6 जण राजकारणाच्या क्षेत्रात पूर्णपणे नवीन आहेत. याशिवाय पश्चिम बंगालमधील पार्थ भौमिक आणि बिप्लब मित्र या दोन मंत्र्यांसह एक राज्यसभा सदस्य आणि 9 आमदारांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आहे.