पटना : सध्या सर्वत्र लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आचार संहिता लागू केली. आचार संहितेचं पालन करायचं म्हटलं तर, 2004 ला निवडणुकांदरम्यान चर्चेत आलेले माजी जिल्हाधिकारी गौतम गोस्वामी यांची आठवण येते. 7 एप्रिल 2004 ला रात्री पटनाच्या गांधी मैदानावर माजी उपपंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांची प्रचार सभा भरली होती. प्रचार सभेत अडवाणी हे त्यांच्या भाषणात मग्न होते. तेवढ्यात मंचावर माजी जिल्हाधिकारी डॉ. गौतम गोस्वामी येतात आणि अडवाणी यांना म्हणतात, “युअर टाईम इज ओव्हर सर”.
हे ऐकून सर्वांच्याच नजरा गौतम गोस्वामींकडे वळल्या. त्यावेळी अडवाणी हे माईकवर बोलत होते. इतकंच नाही तर मंचावर राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (राजग) पक्षाचे बडे नेता नितीश कुमार, सुशील कुमार मोदी, शत्रुघ्न सिन्हा, नंदकिशोर यादव आणि गोपाल नारायण उपस्थित होते.
2004 च्या निवडणुकांवेळी निवडणूक आयोगाने रात्री 10 वाजेनंतर प्रचारासाठी कुठल्याही प्रकारच्या लाउडस्पीकर किंवा साउंड बॉक्सचा वापर करण्यावर बंदी घातली होती. याच आदेशाचं पालन करण्यासाठी गौतम गोस्वामी यांनी मंचावर अडवाणी यांना वेळ संपला असे सांगत त्यांच्या माईकवर हात ठेवला आणि त्यांना पुढील भाषण करण्यापासून रोखलं.
गोस्वामी यांच्या या कारवाईची संपूर्ण देशात चर्चा झाली. नेहमी आपल्या कामासाठी चर्चेत असणाऱ्या गौतम गोस्वांमींना ‘टाईम’ या प्रसिद्ध मासिकाने त्यांच्या कव्हर पेजवर जागा दिली. तसेच, त्यांनी ज्याप्रकारे कायद्याप्रती आपली निष्ठा दाखवली, त्यामुळे जनतेच्या मनातील नोकरशाही ही भ्रष्ट आणि अयोग्य असल्याचा समज दूर झाला आहे, असे लिहिले.
नेहमी आपल्या कामासाठी चर्चेत असणाऱ्या, कामाप्रती प्रामाणिक असण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गौतम गोस्वामी यांच्यावर 2005 ला पूरग्रस्तांना मिळालेल्या मदतीच्या पैशांमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांच्यावर एक लाखांचं बक्षिसही घोषित करण्यात आलं होतं. अखेर गौतम गोस्वामी यांना शिक्षा झाली आणि त्यांना त्यांच्या पदावरुन निलंबित करण्यात आलं. यानंतर 5 जानेवारी 2009 ला कॅन्सर या आजाराने त्यांचा मृत्यू झाला.
बिहारच्या डेहरी आनसोनचे राहणारे गौतम गोस्वामी यांनी काशी येथील हिंदू विश्वविद्यालयातून मेडिसिन विषयात पदवी घेतली. त्यानंतर पदव्यूत्तर झाल्यानंतर त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 1991 ला त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची परिक्षा उत्तीर्ण केली, यामध्ये ते देशात सातव्या क्रमांकावर होते.