नवी दिल्ली : देशाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा सहावा टप्पा 25 मे रोजी पूर्ण झाला. तर, 1 जून रोजी मतदानाचा सातवा आणि अखेरचा टप्पा पूर्ण होईल. अखेरच्या टप्प्यातील होणाऱ्या मतदानासाठी प्रचारात रंगत आली आहे. या निवडणुकीत भाजपने ‘अब की बार, 400 पार’ चा नारा देत विरोधकांच्या प्रचारातील हवा काढून टाकली. निवडणुकीच्या मतदानाचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. निकालानंतर देशात बहुमत कुणाचे हे सिद्ध होईल. पण, भाजपने नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची तयारी पूर्ण केलीय. अशातच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा कधी शपथ घेणार याची तारीखच जाहीर केली आहे.
ओडिशातील पाटकुरा येथे मतदानाच्या शेवटच्या फेरीचा प्रचार करताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा केला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. ओडिशातही भाजपचा विजय होत आहे. आता फक्त निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. नवे भाजप सरकार 10 जून रोजी शपथ घेणार आहे. यानंतर 11 जून रोजी पांडियन यांना तामिळनाडू विमानतळावर पाठवायचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान यांच्यावरही टीका केली. पंजाब कर्जात बुडाला आहे पण आसामच्या वर्तमानपत्रात पंजाब सरकारच्या जाहिराती दिसतात. इथल्या मुख्यमंत्र्यांना सहा-सात चित्रपट करायला एवढा वेळ कसा मिळतो? राज्य कोण चालवत आहे? भगवंत मानजी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वागतासाठी तिहार तुरुंगात गेले होते. भगवंत मानजी ज्या प्रकारे नतमस्तक होतात आणि दारू घोटाळ्यातील गुन्हेगाराचे स्वागत करतात ते पंजाबचे शौर्य कमकुवत करते असा टोला त्यांनी लगावला. त्यांचे वर्तन घटनात्मक भूमिका बजावणाऱ्या नेत्यासाठी अयोग्य असल्याचेही ते म्हणाले.
आसामचा मुख्यमंत्री या नात्याने मी तुरुंगात असलेल्या व्यक्तीचे स्वागत करण्यासाठी उत्तर प्रदेशात जाण्याची कल्पना करू शकत नाही. मी एखाद्या संत किंवा महान व्यक्तीच्या स्वागतासाठी जाऊ शकतो. परंतु, तिहार तुरुंगातून बाहेर आलेल्या व्यक्तीचे स्वागत करायचे असते तर मी दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला असता. हा आसामच्या स्वाभिमानाचा आणि सन्मानाचा विश्वासघात असेल असे ते म्हणाले. जाहीर सभेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हिमंता बिस्वा सरमा यांनी आता प्रतीक्षा फक्त 4 जूनची आहे. आम्ही (भाजप) 400 ने सुरुवात केली होती आणि 400 नेच संपवू असे ते म्हणाले.