मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , गुलाबराव पाटील (gulabrao patil) आणि शिवसेनेचे इतर बंडखोर नेते हे शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या रडारवर होते. या बंडखोरांवर टीका करण्याची राऊत एकही संधी सोडत नव्हते. मात्र, राऊत यांच्या रडारवर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) आले आहेत. राज्यात पूर आहे, जोरदार पाऊस पडत आहे. वादळाची स्थिती आहे. कॉलराचं थैमान आहे. विविध ठिकाणी 100 लोकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. अशा परिस्थितीत राज्यपाल आम्हाला खूप सल्ला द्यायचे. आता त्यांची गरज आहे. आता त्यांना ही परिस्थिती दिसत नाही का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राज्यात 100हून अधिक लोक दगावले आहेत. आता राज्यपाल कुठे आहेत? राज्यात वादळ आहे. पूर आहे. पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी कॉलराने डोकंवर काढलं आहे. रुग्णालयांची अवस्था वाईट आहे. राज्यपाल कुठे आहेत? आम्हाला ते खूप सल्ले द्यायचे. आता त्यांची खरी गरज आहे. आता त्यांनी बोललं पाहिजे. पण राज्यपाल आहेत कुठे? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्र परत लॉकडाऊनमध्ये गेला आहे. काहीच सुरू झाला नाही. 100 हून अधिक लोक महापुरात वाहून गेले. मृत्यूमुखी पडले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कॉलराचं थैमान आहे. लोक मृत्यूमुखी पडत आहेत. सरकार अस्तित्वात नाही. शपथ घेतली म्हणजे सरकार आलं असं नाही. 12 दिवस झाले तरी सरकार अस्तित्वात नाही. कारण दोन लोकांचं सरकार हे बेकायदेशीर आहे. आमदार अपात्रं ठरू शकतात. त्यांना शपथ देणं हा राजद्रोह आहे. हे घटनाबाह्य कृत्य आहे. हा राजकीय भ्रष्टाचार आहे. त्याची भीती असल्याने त्यांना रोखलं असावं. राज्यपालांनी कोणतंही घटनाद्रोही कृत्य करू नये, असं ते म्हणाले.
केंद्र सरकारने काही शब्दांवर बंदी घातली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. या शब्दांवर बंदी घालण्याची वेळ सध्याच्या सरकारवर का आली? कारण हे शब्द याच सरकारविरोधात वापरले जाऊ शकतात, त्यामुळे हा निर्णय घेतला का? भ्रष्ट, गद्दार हा शब्द असंसदीय नाही. तरीही बंदी का? भ्रष्टाचार संपला काय? तरीही भ्रष्ट शब्द वापरायचा नाही. गद्दार हा शब्द तर इतिहास काळापासूनचा आहे. तो शब्द चुकीचा कसा आहे. गद्दाराला गद्दार नाही तर काय म्हणणार? भ्रष्टाचारी व्यक्तीला भ्रष्ट नाही तर काय म्हणायचं? असा सवालही त्यांनी केला.