मुंबई : भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट निवडणूक आयोगालाच धमकी दिली. सत्ता आल्यास निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकू, असं वक्तव्य त्यांनी केलं. पण सत्ता येण्यासाठी किती खासदार लागतात हे तरी प्रकाश आंबेडकरांना माहित आहे का, असा सवाल भाजप नेते आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलाय. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरुन त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही विनोद तावडेंनी निशाणा साधला. ‘तिहार’मधील टांगती तलवार शरद पवार यांच्यावर फिरत आहे. महागठवबंधन मी केले असे शरद पवार सांगत आहेत, पण ते झाले आहे का? केजरीवाल, मायावती महागठबंधनात आहेत का? तिहारच्या टांगत्या तलवारीमुळे शरद पवार प्रचंड अस्वस्थ आहेत, असा घणाघात विनोद तावडे यांनी केला.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचाही विनोद तावडेंनी समाचार घेतला. सत्ता आल्यानंतर चौकीदारांना तुरुंगात टाकू, असं राहुल गांधी नागपुरातील सभेत म्हणाले होते. पण ज्याचा एक पाय जेलमध्ये आहे ते काय चौकीदाराला जेलमध्ये टाकणार? असा सवाल तावडेंनी केला. राहुल गांधी यांचे मेहुणे जेलच्या पायरीवर पोहोचले आहेत. त्यांनी असे बोलणे योग्य आहे का? असं तावडे म्हणाले.
राज ठाकरेंनाही टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आघाडीसाठी सभा घेणार आहेत. यावरही तावडेंनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार असं म्हणत आहेत की राज ठाकरे यांच्या सभा काँग्रेस मागत आहे? पण काँग्रेस या सभा शरद पवार यांच्याकडे मागतायत का? हा सवाल उपस्थित होत आहे, असं तावडे म्हणाले. राज ठाकरे उद्या सभा घेणार आहेत. त्यांची जी स्क्रीप्ट जशी असेल ते तेच बोलणार आहेत, असाही टोला तावडेंनी लगावला.