बारामती : राज्यातील 92 (Council Election) नगपरिषद निवडणुक कार्यक्रम हा (Election Commission) निवडणुक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची रणनिती कशी असणार याची उत्सुकता आता शिघेला पोहचली आहे. शिवाय सत्ता परिवर्तनामुळे भाजप आणि शिंदे गट असेही चित्र निर्माण झाले आहे. मात्र, या निवडणुकांना कसे सामोरे जायचे याबाबत (MVA) महाविकास आघाडीचा सोमवारी निर्णय होणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले आहे. स्थानिक परस्थिती पाहून हा निर्णय घेतला जातो पण यावर सर्वच पक्षांच्या वरिष्ठांचे काय म्हणणे आहे याबाबत सोमवारी निर्णय होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सत्ता परिवर्तनानंतर अजित पवार यांच्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी असली तरी शनिवारी सकाळी त्यांनी बारामती येथील विकास कामांचा आढावा घेऊन आपल्या कामाची कार्यपध्दती ही कायम ठेवली आहे.
राज्यात आता नगरपरिषदा निवडणुका पार पडणार आहेत. त्याअनुशंगाने महाविकास आघाडीचे धोरण हे देखील महत्वाचे राहणार आहे. यापूर्वी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जिल्हा स्तरावर पक्षाचे बलाबल पाहून निर्णय घेतला जात होता. स्थानिक पातळीवर कोणत्या पक्षाचे वर्चस्व आहे त्यानुसार निवडणुकीचे गणित ठरले जात होते. पण यावेळी महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचाही समावेश आहे. त्यामुळे निवडणुका एकत्रित लढायच्या का स्वतंत्र याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. निवडणुका जाहिर करण्याचा अधिकार निवडणुक आयोगाचा आहे.
आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण हे देखील महत्वाचे आहे. यासंबंधी इम्पेरीकल डाटा आणि बाठिया समितीचा अहवाल तयार झाला असेल असे मतही अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. याबाबत 15 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात निकाल सुनावणी असून त्यावरच सर्वकाही अवलंबून आहे. मात्र, मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही न्याय मिळावा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी प्रवर्गालाही प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी असे आपले मत असल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय नाट्यानंतर आता पुन्हा सर्वच पक्षांना निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे.
दोन वर्ष कोरोनामुळे आषाढी वारीचा सोहळा हा औपचारिक पध्दतीने साजरा केला जात होता. यंदा कोरोनामुक्त वारी होत आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह दुणावला असून अधिकची गर्दीही होणार आहे. यावर्षी नेहमीपेक्षा जास्त वारकरी या सोहळ्यात सहभागी आहेत. त्यामुळे सर्वांना सुखाचे आणि आनंदाचेच दिवस पहायला मिळावेत अशी साकडे पांडुरंगाला असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर त्यांनी बारामती येथील विकास कामाचा आढावा घेतला.