औरंगाबाद : राज्यात कोणता भोंगा बंद झाला? हनुमान चालीसा कुठं आहे? असा सवाल करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एवढंच नाही तर राज ठाकरे भाजपचीच भूमिका मांडत असल्याची घणाघाती टीका दानवे यांनी केली. राज ठाकरे हे भाजपचीच (BJP) भाषा बोलत असल्याचा पलटवार दानवे यांनी केला.ठाकरे यांनी मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी उद्धव ठाकरे यांची मिमिक्रीही केली.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना तब्यतीचं कारण सांगून उद्धव ठाकरे यांनी कसं काम केलं, याची मिमिक्री करुन दाखविली. एकनाथ शिंदे यांनी रात्रीतून जादूची कांडी फिरवल्याने आता ते सगळीकडे फिरत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायाचा आणि कोपऱ्यात जायचा, असं आमचं काम नाही, स्वार्थासाठी कधी हा, कधी तो अशी आपली भूमिका नसल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
तर उद्धव ठाकरे ज्या आजारपणाला सामोरे गेले, जी शस्त्रक्रिया त्यांच्यावर झाली, तरी ते कार्यरत होते. कोरोना काळातही त्यांनी काम केले. जागतिक स्तरावर धारावी पॅटर्न नोंदविला गेला. उत्तर प्रदेशमध्ये नदीमध्ये प्रेत सोडण्यात आली. गुजरातमध्ये तीन-तीन दिवस रुग्णांना बेड मिळाला नाही, याची आठवण दानवे यांनी राज ठाकरे यांना करुन दिली.
उद्धव ठाकरे यांनी देता की जाता, चालते व्हा असे अनेक आंदोलने उभी केली आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे भूमिका घेत नाहीत, घराच्या बाहेर पडत नाहीत, या टीकेला कुठलाही अर्थ नसल्याचा पलटवार दानवे यांनी केला.
राज्यात कोणता भोंगा बंद झाला? हनुमान चालीसा कुठं आहे? असा सवाल करत अंबादास दानवे यांनी राज ठाकरे हे भाजपचा अजेंडा पुढे रेटत असल्याचा आरोप केला. शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये, असेही ते म्हणाले.