मुंबई: उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे थोड्याचवेळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांच्यासारख्या बड्या नेत्याला महाविकासआघाडी सरकारमध्ये कोणती जबाबदारी मिळणार, याची चर्चा सुरु आहे. एकनाथ खडसे यांना शिवसेनेकडील कृषीमंत्रिपद किंवा राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडील गृहनिर्माण खाते दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, जितेंद्र आव्हाड पक्षाच्या या निर्णयावर नाराज असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे यांनी अजून काही मागणी केलेली नाही आणि आमच्यातही अजून तशी चर्चा झालेली नाही, असे सांगत जयंत पाटील यांनी काढता पाय घेतला. (Jayant Patil on Eknath Khadse future Portfolio)
खडसेंच्या प्रवेशाआधी जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या भेटीला, चेहऱ्यावर तणाव
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना कोणती जबाबदारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं असतानाच जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे दाखल झाले आहेत. एकनाथ खडसे यांच्यासाठी गृहनिर्माणमंत्रिपद सोडण्यासाठी आव्हाड तयार नसल्याचे समजते. त्यामुळे आता शरद पवार यांच्या भेटीनंतर आव्हाड आपली भूमिका बदलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
खडसेंच्या पक्षप्रवेश सोहळ्याला 11 दिग्गजांची उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे प्रवेश करत असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘भाजपला नामोहरम करण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरेंवर दबाव टाकू शकतात’
एकनाथ खडसे यांचा थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खडसेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं की नियोजन मंडळावर त्यांची वर्णी लावायची, याबाबत महाविकास आघाडीत संभ्रम असल्याचं पाहायला मिळतंय. कारण, शिवसेना कृषीमंत्रीपद सोडण्यास तयार नसल्याची माहिती मिळतेय. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडही आपल्याकडील गृहनिर्माण खातं खडसेंना देण्यास तयार नसल्याचं कळतंय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या:
“शिवसेना इगो सोडून खडसेंना कृषिमंत्रीपद देईल का हा प्रश्नच”
(Jayant Patil on Eknath Khadse future Portfolio)