मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 43 नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात कराड यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून कराड यांची ओळख आहे. त्यांच्यामुळेच कराड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तीनवेळा नगरसेव, औरंगाबादचे माजी महापौर ते केंद्रीय मंत्री असा कराड यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. (Who is Bhagwat Karad)
-1995 ते 2009 या कालावधीत औरंगाबाद महापालिकेत तीन वेळा नगरसेवक
-1997 ते 1998 औरंगाबादचे उपमहापौर
-2000 ते 2001 आणि 2006 ते 2007 औरंगाबादचे महापौर
-2009 मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी
डॉ. भागवत किशनराव कराड यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील चिखली गावात झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कराड यांचे दहावीपर्यंतचे जिल्हा परिषद शाळेत झाले. अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून त्यांनी प्री-मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदवी संपादन केली. एमएस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील वैद्यकीय क्षेत्रातील अती उच्च एम.सीएच (पेडियाट्रीक) ही मिळवली. मराठवाड्यातील अशा प्रकारची पदवी घेणारे वैद्यकीय क्षेत्रातील पहिले डॉक्टर असल्याचा भागवत कराड यांचा दावा आहे.
डॉ. भागवत कराड आणि त्यांची पत्नी डॉ. अंजली कराड दोघांनीही डॉ. वाय. एस. खेडकर यांच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. 1990 मध्ये ‘डॉ. कराड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर’ या नावाने हॉस्पिटल सुरु केले. अनेक वर्षे रुग्णसेवा केल्यानंतर 1995 साली औरंगाबाद महानगरपालिका कोटला कॉलनी वॉर्डातून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी कराड यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. सध्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Who is Bhagwat Karad)
26 मार्च रोजी 2020 रोजी राज्यसभेची निवडणूक झाली. त्यात कराड विजयी झाले. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. ही मतं कराड यांना मिळाल्याने त्यांचा विजय सोपा झाला आहे. (Who is Bhagwat Karad)
कराड यांना मंत्रिपद देऊन मोदींनी जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. कराड हे वंजारी आहे. ते ओबीसी प्रवर्गातून येतात. महाराष्ट्रात सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळे ओबीसी मतदार आपल्याकडे वळवण्यासाठीच भाजपने कराड यांना मंत्रिपदाची संधी दिल्याचं बोललं जात आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 7 July 2021 https://t.co/VxS5s4m6LJ #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 7, 2021
संबंधित बातम्या: