मुंबई : महाराष्ट्रात राजकीय भूकंप झालाय. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून थेट सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर जाणार याबाबत तर्कवितर्क सुरु होते. त्यानंतर चर्चेत सर्वात आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते दिलीप वळसे पाटील यांचं नाव होतं. वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वीय सहाय्यक पदापासून तर अनेक कॅबिनेट मंत्रिपदांपर्यंत जबाबदाऱ्या पार पाडल्यात. हेच वळसे पाटील आता राज्याचे गृहमंत्री असणार आहेत. गृहविभागाचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या निमित्ताने त्यांच्या राजकीय आलेखाचा हा आढावा. (Who is Dilip Walse Patil PA of Sharad Pawar to Cabinet Minister of Maharashtra Know all about him).
कोण आहेत दिलीप वळसे पाटील?
वळसे पाटील माझे राजकीय गुरूः गिरीश बापट
दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक पक्षांमध्ये आपल्या मित्रांचं जाळं उभं केलंय. त्यामुळेच त्यांच्या एकसष्ठीच्या कार्यक्रमात तत्कालीन राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश बापट यांनी दिलीप वळसे पाटील माझे मार्गदर्शक आणि राजकीय गुरु आहेत हे सांगितलं. तसेच हे सांगायला मी कुणालाही घाबरत नाही आणि अजिबात संकोचही वाटत नाही’, असंही बापट यांनी नमूद केलं होतं.
शिक्षणापासून राजकारणापर्यंतचा प्रवास
नाव : दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
जन्म : 30 ऑक्टोबर, 1956
जन्म ठिकाण : निरगुडसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे .
शिक्षण : बी. ए. (ऑनर्स), डी. जे., एल.एल.एम.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती किरण
अपत्ये : एकूण 1 (एक मुलगी)
व्यवसाय : शेती व व्यापार
पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मतदारसंघ : 196 – आंबेगाव, जिल्हा पुणे.
इतर माहिती : महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणात तसेच सहकारी चळवळीमध्ये राज्यातील नेत्यांच्या सानिध्यात राहून सक्रिय सहभाग; संस्थापक – अध्यक्ष, राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र, पुणे, या संस्थेमार्फत ग्रामीण, दुर्गम आदिवासी भागातील जनतेच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविले; ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायास प्रोत्साहन देऊन संस्थांचे जाळे विकसित केले व त्याद्वारे सर्वसामान्य जनता विशेषतः ग्रामीण महिला वर्गाच्या आर्थिक सक्षमीकरणाचे कार्य; विश्वस्त. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व महाराष्ट्रातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी निकटचा संबंधः संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक; संस्थापक-चेअरमन, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना.
1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009,2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 1992-93 समिती प्रमुख, विधिमंडळ अंदाज समिती सन 1998-99 मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र विधान सभेतील “उत्कृष्ट संसदपटू” या पुरस्काराने सन्मानित; ऑक्टोबर 1999 ते डिसेंबर, 2002 उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; डिसेंबर, 2002 ते नोव्हेंबर 2004 ऊर्जा, व उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; नोव्हेंबर 2004 ते मार्च 2005 ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून) व वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री; मार्च 2005 ते डिसेंबर 2008 ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून), वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; डिसेंबर 2008 ते ऑक्टोबर, 2009 वित्त व नियोजन खात्याचे मंत्री;
मंत्रीपदी कार्यरत असताना महत्वपूर्ण धोरणात्मक व उल्लेखनीय निर्णय घेतले, त्यामध्ये प्रामुख्याने ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ’ या कंपनीची स्थापना करून गतीने विकास केला, त्यामुळे राज्यात संगणक साक्षरता वाढीचे महत्त्वाचे कार्य होऊ शकले विद्युत कायदा 2003 ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली; ऊर्जा क्षेत्रात राज्याला योग्य दिशा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन करून सूत्रधारी कंपनी, महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या चार कंपन्यांची स्थापना केली व ऊर्जा विकासासाठी रोडमॅप केला, 6000 मेगावॅटचे प्रकल्प उभारण्याचे व विद्युत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले; 2009-2014 अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा; या काळात विधान मंडळाचे कामकाज योग्य पद्धतीने चालावे यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले .
2012-13 मध्ये महाराष्ट्र विधान मंडळाच्या अमृत महोत्सव समारंभाचे भारताच्या राष्ट्रपती महामाहिम प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन केले; तसेच यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रदर्शन व चर्चा सत्रांचे आयोजन ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.
हेही वाचा :
दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री होण्याची चिन्हं, उद्याच चार्ज घेणार?
Anil Deshmukh Resignation : अनिल देशमुखांचा राजीनामा, गृहमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार?
Anil Deshmukh resign: अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं
व्हिडीओ पाहा :
Who is Dilip Walse Patil PA of Sharad Pawar to Cabinet Minister of Maharashtra Know all about him